चंद्रपूर/सिंदेवाही
tiger-attacks जिल्ह्यात शुक्रवार, 30 ऑक्टोबर रोजी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकर्यांचा मृत्यू झाला. या घटना सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा व चिमूर तालुक्यातील उरकुडपार येथे घडल्या. सदाशिव चिरकूटा खडसंग (55, रा. गरडापार, ता. चिमूर) व पत्रू रामा मेश्राम (75, रा. धुमनखेडा, ता. सिंदेवाही) अशी मृतक शेतकर्यांची नावे आहेत.
चिमूर तालुक्यातील गरडापार येथील सदाशिव खडसंग हे आपल्या शेतालगत असलेल्या उरकुडपार जंगल परिसरात झाडाझुडपे तोडायला गेले होते. त्यावेळी जंगलात बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, चिमूरचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, सहायक पोलिस निरीक्षक खोब्रागडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
तर, सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा येतील शेतकरी पत्रू रामा मेश्राम (75) हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास स्वत:च्या मालकीच्या शेतात जात होते. त्यावेळी गावाजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचाही जागीच मृत्यू झाला.
मागील दोन-तीन दिवसांपूर्वी धूमनखेडापासून जवळच असलेल्या भेंडाळा व पळसगाव येथील शेतकर्यास वाघाने ठार केले होते. ही घटना ताजी असतानाच आणखी पुन्हा वाघाच्या हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.