गोंदिया
unity-day-celebrations एकेकाळी नक्षलवादाच्या सावटाखाली असलेल्या गोंदिया जिल्ह्याने शांतता आणि विकासाच्या दिशेने केलेल्या वाटचालीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील एकता नगर (केवडिया) येथे आयोजित राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ५० नागरिकांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे होणार्या या ऐतिहासिक सोहळ्यात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नागरिकांचे पथक गुजरातला रवाना झाले आहे.
केंद्र शासनाच्या विशेष उपक्रमांतर्गत पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना या राष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमधून प्रत्येकी ५० नागरिकांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील नक्षलप्रभावित भागांतील ५० नागरिक या उपक्रमात सहभागी होत आहेत. पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या समन्वयातून या दौर्याचे नियोजन करण्यात आले. गोंदिया जिल्ह्याने गेल्या काही वर्षांत नक्षलवादाच्या प्रभावातून बाहेर पडत शांतता, सुरक्षितता आणि विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल केली आहे. दुर्गम व आदिवासीबहुल भागांत रस्ते, वीज, पाणी, मोबाईल नेटवर्क, शिक्षण आणि सार्वजनिक वाहतुकीसारख्या मूलभूत सुविधांचा विस्तार झाला आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यातही यंत्रणांना यश आले आहे. या परिवर्तनात जिल्हा पोलिस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी या उपक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि आरोग्यविषयक सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पोलिस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते दृढ करण्यासोबतच युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला जात आहे. केंद्र शासनाने ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचा संकल्प केला होता. या पार्श्वभूमीवर पूर्वी नक्षलप्रभावित असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करणे, हा शांतता आणि विकासाच्या प्रवासाचा गौरव मानला जात आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीत ऐतिहासिक योगदान दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यात नक्षलप्रभावित भागातील नागरिकांना सहभागी होण्याची मिळालेली संधी ही गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
‘नक्षलमुक्त गोंदिया, सुरक्षित गोंदिया आणि विकसित गोंदिया’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जिल्हा पोलिस दल कटिबद्ध असून, जिल्ह्यात शांतता, विश्वास आणि विकासाची वाटचाल अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.
- गोरख भामरे, पोलिस अधीक्षक, गोंदिया