वाशीम,
district-collector-kumbhejkar मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ अंतर्गत प्रलंबित नोटिसावरील कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण करून मतदार याद्यांच्या अचूकतेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विरेंद्र जाधव, निवडणूक नायब तहसीलदार एस. एम. पढवे, महसूल अधिकारी रवि महाले तसेच राजकीय पक्षांच्या वतीने काँग्रेसचे अध्यक्ष राजू चौधरी, जिल्हा सरचिटणीस उज्ज्वल देशमुख व सचिव सुरेश रत्नपारखी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा समन्वयक डॉ. विशाल सोमटकर आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय बाजड, प्रतिनिधी सतीश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
मतदार याद्यांचे पुनरीक्षण, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ते यांच्या नियुक्त्या, दावे व हरकतींचा निपटारा याबाबत यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार असल्याने त्यापूर्वी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिले.
ज्या मतदारांची नोटीसांबाबतची कार्यवाही अद्याप प्रलंबित आहे, अशा मतदारांच्या याद्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता करावी, अशी यादी जिल्हा प्रशासनाच्याअधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित मतदारांनी आपली नोंद तपासून आवश्यक कार्यवाहीबाबत माहिती घ्यावी, तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पुनरीक्षण प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.