कारंजा लाड,
washim-news रस्त्यावर भिक्षा मागणारी माणसे दिसतात, तेव्हा अनेकदा आपण त्यांच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखे पुढे निघून जातो. मात्र, त्यांच्या चेहर्यामागे दडलेली वेदना, परिस्थितीने आलेले एकाकीपण आणि मदतीची अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न क्वचितच होतो. याच सामाजिक जाणिवेतून बुधवारी कारंजा शहरात मिशन वात्सल्य अंतर्गत भिक्षेकरी शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत भिक्षा मागणार्या व्यक्तींचा शोध घेण्यासोबतच समाजातील बेघर, निराधार आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधले गेले.

कारंजा शहरातील बायपास व बसस्थानक परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान गिर्डा येथील ७० वर्षीय राजाराम चव्हाण हे बसस्थानक परिसरात भिक्षा मागताना आढळून आले. त्यांना कारंजा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मुलांना बोलावून त्यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यापुढे भिक्षा न मागण्याबाबत त्यांच्याकडून लेखी हमी घेण्यात आली. वृद्धापकाळात माणसाला केवळ अन्न-वस्त्राचीच नव्हे, तर आपुलकीच्या दोन शब्दांची आणि आपल्या माणसांच्या सहवासाचीही गरज असते. राजाराम चव्हाण यांच्या परिस्थितीमागील कारणे स्पष्ट नसली, तरी या घटनेने वृद्ध आणि निराधार व्यक्तींच्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज अधोरेखित केली. प्रत्येक वृद्धाला एकाकीपणाऐवजी कुटुंबाचा आधार मिळावा आणि प्रत्येक निराधार व्यक्तीला सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, हाच या मोहिमेचा खरा सामाजिक संदेश आहे.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि मिशन वात्सल्य तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार रवी महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी (शहरी) अर्चना इंगोले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, चाइल्ड हेल्पलाइनचे अमोल देशपांडे, शहर पोलिस ठाण्याचे गजानन पत्रे, संरक्षण अधिकारी रामदास वानखडे, नगर परिषद कर्मचारी राजू मनवर व सावते, शहरी अंगणवाडी प्रतिनिधी गीता काटकर व प्रवीणा यादव, न्यायालयीन लिपिक अकरम सिद्दिकी, तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक प्रभाकर बोरकर, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे पर्यवेक्षक गायकवाड, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी केळतकर आदी सहभागी झाले.तसेच सर्वधर्म मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा मिशन वात्सल्य समिती सदस्य श्याम सवाई, सास जनसंपर्क अधिकारी तथा बाल व महिला गंगा फेलो धनंजय राठोड आणि गंगा फेलो प्रसन्ना काळबांडे यांनीही मोहिमेत सहभाग घेतला.
मोहिमेदरम्यान शहरात बेघर व निराधार स्वरूपात फिरणार्या अनेक व्यक्तींकडे आधार कार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळविणे आणि मूलभूत सुविधा मिळविणे त्यांच्यासाठी कठीण ठरू शकते. अशा व्यक्तींना केवळ रस्त्यावरून हटविण्यापेक्षा त्यांच्या अडचणी समजून घेऊन आवश्यक कागदपत्रे, आरोग्यसेवा, निवारा आणि पुनर्वसनासाठी मदत उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.
श्याम सवाई ,सदस्य मिशन वात्सल्य समिती
भिक्षा मागणार्या बालकांचा शोध घेणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, हाही या मोहिमेचा महत्त्वाचा उद्देश आहे. परिस्थितीमुळे लहान वयातच भिक्षा मागण्याची वेळ आलेल्या मुलांना शिक्षण, समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. व्यसनाधीनतेच्या धोयापासून बालकांचे संरक्षण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संबंधित विभागांनी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अर्चना इंगोले, बालविकास प्रकल्प अधिकारी शहरी