वॉशिंग्टन,
17-countries-emergency-alertयुरोपपासून आशियापर्यंत १७ देशांनी नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. घरात किमान तीन दिवस पुरेल इतका अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा ठेवण्याचे आवाहन अनेक सरकारांनी केले आहे. काही देशांनी तर सात ते दहा दिवसांचा साठा ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जग एखाद्या मोठ्या संकटाच्या तयारीत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ब्रिटनने नागरिकांना किमान तीन दिवस पुरेल इतका अन्न आणि पाण्याचा साठा ठेवण्यास सांगितले आहे. जपाननेही तीन दिवसांचा साठा ठेवण्याचा सल्ला दिला असून, शक्य असल्यास तो एका आठवड्यापर्यंत वाढवण्याचे आवाहन केले आहे. बेल्जियम, फ्रान्स, नेदरलँड्स आणि फिनलंड या देशांनी किमान ७२ तासांची तयारी ठेवण्यास सांगितले आहे. तर स्वीडन आणि नॉर्वेने नागरिकांना सात दिवस स्वतःच्या गरजा भागवता येतील, अशी व्यवस्था करण्याचा सल्ला दिला आहे. जर्मनीने तीन ते दहा दिवसांचा साठा ठेवण्यास सांगितले आहे. तैवानमध्येही नागरिकांना एका आठवड्याच्या गरजेपुरत्या वस्तू घरात ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र, या सूचनांचा अर्थ जगात युद्ध सुरू होणार आहे किंवा एखादी मोठी आपत्ती येणार आहे, असा होत नाही. सरकारांनी कोणत्याही युद्धाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण भविष्यात अचानक संकट निर्माण झाल्यास मदत पोहोचण्यास वेळ लागू शकतो, याची जाणीव सरकारांना झाली आहे.
वीजपुरवठा अनेक दिवस खंडित झाला तर एटीएम बंद पडू शकतात. ऑनलाइन पेमेंट सेवा ठप्प होऊ शकतात. मोबाईल नेटवर्क बंद पडू शको. पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था कोलमडल्यास सुपरमार्केटमधील वस्तूही मिळणे अवघड होऊ शकते. अशा वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
घरात काही रोख रक्कम ठेवा
युक्रेनमधील युद्ध, कोरोना आणि जगभरात वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा अनुभव लक्षात घेऊन अनेक देशांनी ही खबरदारी घेतली आहे. पूर, वणवे, वादळे, उष्णतेच्या लाटा, सायबर हल्ले आणि आंतरराष्ट्रीय तणाव यामुळेही मोठे संकट निर्माण होऊ शकते. पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ, आवश्यक औषधे, टॉर्च, अतिरिक्त बॅटरी, पॉवर बँक, रेडिओ आणि काही रोख रक्कम घरात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या वस्तू एकाच वेळी खरेदी करण्याऐवजी हळूहळू साठवून ठेवाव्यात. घाबरून जाऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची गरज नाही.