कारागृहातून १७ कैदी फरार; मुख्यमंत्री विजय यांची मोठी कारवाई!

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
चेन्नई,
chief-minister-vijay-takes-major-action तामिळनाडूतील थेनी जिल्हा कारागृहातून १७ कैदी पळून गेल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री विजय यांनी कारागृह प्रशासनावर कारवाई केली आहे. कारागृहाच्या सुरक्षेतील त्रुटी आणि देखरेखीतील हलगर्जीपणामुळे उप-कारागृह अधीक्षक एन. रामलिंगम यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय १७ कारागृह कर्मचाऱ्यांनाही निलंबित करून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ऑगस्ट २०२४ पासून रामलिंगम थेनी कारागृहात कार्यरत होते. एएनआयच्या वृत्तानुसार, कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेतील अपयशामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
 
chief-minister-vijay
 
या घटनेनंतर मुख्यमंत्री विजय यांनी राज्यातील सर्व कारागृहांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पळून गेलेल्या सर्व १७ कैद्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. आता या कैद्यांना राज्यातील उच्च सुरक्षा असलेल्या कारागृहांमध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पीटीआयने पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे.
 
विशेष म्हणजे, तामिळनाडूमध्ये कारागृहातून कैदी पळून जाण्याची ही काही दिवसांतील दुसरी घटना आहे. २० ऑक्टोबर रोजी चेन्नईजवळील पुझल येथील उच्च सुरक्षा कारागृहातून दोन कैद्यांनी पलायन केले होते. सात पोलीस पथकांनी सलग दोन दिवस शोधमोहीम राबवल्यानंतर या दोघांनाही पकडण्यात आले. एका आठवड्यात घडलेल्या या दोन घटनांमुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यानंतर गुरुवारी राज्य सरकारने तुरुंग आणि सुधार सेवा विभागाचे पोलीस महासंचालक डॉ. संदीप राय राठोर यांचीही बदली केली.
 
थेनी कारागृहातील पलायनाची घटना सोमवारी रात्री घडली होती. कैद्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा बनाव केला. त्यांच्यापैकी एका कैद्याला अपस्माराचा झटका आल्याचे भासवण्यात आले. परिस्थिती पाहून मदतीसाठी एका रक्षकाने कोठडीचा दरवाजा उघडताच कैद्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला मारहाण करून ताब्यात घेतले.
 
यानंतर कैद्यांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या चाव्या हस्तगत केल्या. कारागृहाचा दरवाजा उघडून त्यांनी जवळच्या जंगलाच्या दिशेने पळ काढला. पुढे अरंजनैपुदूर परिसरातून मोटारसायकलच्या मदतीने ते उत्तमपालयमच्या दिशेने रवाना झाले. अम्माचीपुरम येथे एका अनोळखी व्यक्तीकडून फोन मिळवल्यानंतर त्यांनी बाहेर असलेल्या साथीदारांशी संपर्क साधला. या साथीदारांनी त्यांना पळून जाण्यासाठी आवश्यक असलेले पैसे, कपडे आणि वाहने उपलब्ध करून दिल्याचे तपासात समोर आले.
 
पळून गेलेल्या कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली होती. यासाठी १७ विशेष पोलीस पथके, विशेष कृती दलाची पाच युनिट्स आणि तामिळनाडू विशेष पोलिसांच्या चार बटालियन तैनात करण्यात आल्या होत्या. घनदाट जंगल परिसर आणि संशयित ठिकाणांची तपासणी करण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत पाच कैद्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या सलग घटनांनंतर तामिळनाडू सरकारने कारागृह प्रशासनातील जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात केली असून, राज्यातील सर्व कारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.