मालाडमधील चाळींच्या पुनर्विकासावरून अभिजीत केळकर आक्रमक

बिल्डरकडून रहिवाशांना धमकावल्याचा आरोप

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
मुंबई
Abhijeet Kelkar मराठी मनोरंजनविश्वातील कलाकार आता सामाजिक प्रश्नांवरही उघडपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. अभिनेता अभिजीत केळकर याने मुंबईतील मालाड पूर्व परिसरातील चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित करत थेट राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. या संदर्भात त्याने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टॅग केले आहे. चाळीतील रहिवाशांची घरे पाडण्याच्या प्रक्रियेवर त्याने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
 

Abhijeet Kelkar Tags Devendra Fadnavis, Eknath Shinde Over Malad Chawl Demolition Issue 
 
 
अभिजीतने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून केलेल्या पोस्टमध्ये मालाड पूर्व येथील चाळींच्या पुनर्विकासादरम्यान काही लोकप्रतिनिधी आणि बिल्डर यांच्या संगनमताने रहिवाशांची घरे पाडली जात असल्याचा आरोप केला आहे. बिल्डरशी संबंधित व्यक्तींकडून रहिवाशांना रात्रीच्या वेळी धमकावून घरे रिकामी करण्यास भाग पाडले जात असल्याचेही त्याने म्हटले आहे. हा प्रकार केवळ ऐकीव माहितीवर आधारित नसून आपण स्वतः या परिस्थितीचा सामना करत असल्याचेही अभिजीतने स्पष्ट केले आहे.
 
 
काय आहेत अभिजीतचे गंभीर आरोप?
 
 
आपल्या पोस्टमध्ये अभिजीतने पुनर्विकासाच्या कामाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित चाळींची घरे अर्धवट पाडण्यात आली असून, परिसरात बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यासाठी आवश्यक रस्त्याची व्यवस्था नसल्याचा त्याचा दावा आहे. या ठिकाणी ये-जा करण्यासाठी केवळ एका बाजूला पादचाऱ्यांना जाता येईल इतकाच पूल असल्याचे त्याने नमूद केले आहे. अशा परिस्थितीत पुनर्विकासाचा प्रकल्प प्रत्यक्षात कसा पूर्ण होणार, असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.
 
 
या जागेच्या मूळ मालकांकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्यात आले नसल्याचा आरोपही त्याने केला आहे. याच कारणामुळे जागेचे मालक न्यायालयात गेले असल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. भविष्यात घरे पूर्णपणे पाडल्यानंतर न्यायालयाने प्रकल्पाला स्थगिती दिली, तर रहिवाशांना ना नवीन घरे मिळतील ना भाड्याची रक्कम, अशी भीती त्याने व्यक्त केली आहे.
याशिवाय, संबंधित परिसराच्या शेजारी लष्करी छावणी असल्याकडेही अभिजीतने लक्ष वेधले आहे. संरक्षण विभागाच्या (COD) नियमानुसार ठरावीक हद्दीत विशिष्ट उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारती उभारण्यास परवानगी नसल्याचा मुद्दा त्याने मांडला आहे. भविष्यात संरक्षण विभागाने या बांधकामावर आक्षेप घेतला, तर पुनर्विकासाचे काय होणार, असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.
 
 
जुन्या रहिवाशांना अपात्र ठरवल्याचा दावा
 
 
या पोस्टमध्ये अभिजीतने एसआरएच्या (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून चाळीत वास्तव्यास असलेल्या, मात्र बिल्डरसमोर न झुकणाऱ्या काही रहिवाशांना एसआरए प्रक्रियेत अपात्र ठरवण्यात आल्याचा त्याचा आरोप आहे. दुसरीकडे, काही गावगुंडांनी अनधिकृत झोपड्या उभारून त्या पात्र करून घेतल्याचा दावाही त्याने केला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या मूळ रहिवाशांवर अन्याय होत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
 
 
पोस्टच्या अखेरीस अभिजीतने संबंधित लोकप्रतिनिधींना थेट जाब विचारला आहे. चाळीतील सर्व रहिवाशांना त्यांची हक्काची घरे मिळतील आणि अपात्र ठरवण्यात आलेल्या नागरिकांना पुन्हा पात्र करण्यात येईल, याची जबाबदारी लोकप्रतिनिधी घेणार का, असा सवाल त्याने केला आहे. याबाबत लेखी आश्वासन देण्याची तयारी असल्यास रहिवासी आवश्यक त्या कागदपत्रांवर सह्या करण्यास तयार असल्याचेही त्याने म्हटले आहे.अभिजीत केळकरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, त्याने या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट टॅग केल्याने या मुद्द्याकडे आता सरकारचे लक्ष जाणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, पोस्टमधील आरोपांवर संबंधित बिल्डर, लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.