‘बॉर्डर 2’नंतर अहान शेट्टीचा अ‍ॅक्शन अवतार

‘सनकी’च्या चित्रीकरणाला भोपाळमध्ये सुरुवात

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
मुंबई
Ahan Shetty ‘बॉर्डर 2’च्या यशानंतर अभिनेता अहान शेट्टी आता नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी ‘सनकी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ३० ऑक्टोबरपासून भोपाळमध्ये सुरुवात होणार आहे. ‘रुस्तम’ आणि ‘मिशन रानीगंज’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे टीनू सुरेश देसाई या चित्रपटाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यामुळे अहानला पुन्हा एकदा अ‍ॅक्शनप्रधान भूमिकेत पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
 

tt 
ज्ञानेंद्र वासुदेव यांनी ‘सनकी’चे लेखन केले आहे. हा चित्रपट मुख्यतः प्रेमकथेवर आधारित असला, तरी त्यात भावनिक प्रसंगांसोबतच थरारक अ‍ॅक्शनचाही समावेश असणार आहे. प्रेम आणि अ‍ॅक्शन यांचा संगम असलेली ही कथा पडद्यावर कशा पद्धतीने उलगडते, याबाबत सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘बॉर्डर 2’मधील अभिनय आणि चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अहान शेट्टी आगामी चित्रपटांची निवड काळजीपूर्वक करत आहे. ‘सनकी’च्या माध्यमातून तो आपल्या कारकिर्दीतील पुढच्या टप्प्याला सुरुवात करणार आहे. या चित्रपटानंतर तो विक्रम भट्ट यांच्या ‘1920 कोल्ड विंटर’मध्ये झळकणार आहे. याशिवाय त्याच्या काही अन्य चित्रपटांचे चित्रीकरण २०२७ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिग्दर्शक टीनू सुरेश देसाई आपल्या मोठ्या टीमसह आधीच भोपाळमध्ये दाखल झाले आहेत. प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी चित्रपटाच्या विविध तयारींना अंतिम स्वरूप दिले जात आहे. चित्रपटाची कथा आणि त्यातील महत्त्वाचे तपशील सध्या गुप्त ठेवण्यात आले आहेत. निर्माते आगामी काळात टप्प्याटप्प्याने चित्रपटाशी संबंधित माहिती जाहीर करणार आहेत.
‘वी द पीपल’, ‘रोअरिंग रिव्हर प्रॉडक्शन्स’ आणि ‘पाल्स अँड पीअर्स एंटरटेनमेंट’ या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून ‘सनकी’ची निर्मिती केली जात आहे. २०२७ च्या पहिल्या सहामाहीत हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अहान शेट्टीच्या या नव्या अ‍ॅक्शन-रोमँटिक चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.