डॉ. प्रवीण महाजन
स्वीडिश अकादमीने ॲन कार्सन यांचा गौरव करताना त्यांच्या साहित्यातील नावीन्याचा आणि धाडसाचा विशेष उल्लेख केला आहे. कार्सन यांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी साहित्यातील गद्य आणि पद्य यांच्यातील प्रस्थापित भिंती पूर्णपणे पाडून टाकल्या आहेत. मुळात त्या प्राचीन ग्रीक साहित्याच्या गाढ अभ्यासक आहेत. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान आणि साहित्य आजच्या आधुनिक, गुंतागुंतीच्या जीवनाशी कसे जोडले जाऊ शकते, याचे त्या मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांची 'ऑटोबायोग्राफी ऑफ रेड' ही जगप्रसिद्ध काव्य-कादंबरी साहित्यातील एक चमत्कार मानली जाते. यात त्यांनी 'जेरियन' या प्राचीन ग्रीक मिथकातील लाल पंख असलेल्या राक्षसाला एका आधुनिक, समलिंगी आणि संवेदनक्षम तरुण फोटोग्राफरच्या रूपात उभे केले.

गेल्या पाच वर्षांतील नोबेल विजेते
जागतिक साहित्यातील बदलत्या प्रवाहांचा, विषयांच्या खोलीचा आणि नोबेल समितीच्या दृष्टिकोनाचा अंदाज यावा, यासाठी गेल्या पाच वर्षांतील नोबेल विजेत्यांवर एक नजर-* २०२१ - अब्दुल रझाक गुरनाह (टांझानिया/ब्रिटन) : वसाहतवादाचे दुष्परिणाम आणि दोन भिन्न संस्कृतींमध्ये अडकलेल्या निर्वासितांच्या व्यथेचे अत्यंत करुणामय चित्रण केल्याबद्दल.
* २०२२ - ॲनी एर्नो (फ्रान्स) : वैयक्तिक स्मृतींमधील मुळे, दुरावा आणि सामूहिक बंधने ज्या धैर्याने उलगडून दाखवली, त्या अत्यंत वास्तववादी लेखनासाठी.* २०२३ - जॉन फॉसे (नॉर्वे) : मानवी अस्तित्वातील अस्वस्थता आणि ज्या गोष्टी शब्दांत सांगता येत नाहीत, त्यांना वाचा फोडणाऱ्या त्यांच्या नावीन्यपूर्ण नाटकांकरिता.
* २०२४ - हान कांग (दक्षिण कोरिया) : ऐतिहासिक आघात आणि मानवी जीवनाची नाजूकता अत्यंत काव्यात्मक आणि तीव्र गद्यात मांडल्याबद्दल.* २०२५ - लास्लो क्रास्नाहोर्काई (हंगेरी) : विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाचे आणि कोसळणाऱ्या समाजव्यवस्थेचे चित्रण करणाऱ्या भेदक साहित्यासाठी.
टागोरांनंतर भारतात साहित्याची विपुल निर्मिती झाली, पण त्याला जागतिक मान्यता किंवा ती तत्त्वज्ञानात्मक खोली का प्राप्त झाली नाही? या प्रश्नाचे अत्यंत परखड आणि मार्मिक उत्तर आधुनिक मराठी कवितेचे जनक आणि श्रेष्ठ समीक्षक बा. सी. मर्ढेकर यांच्या लेखनात आणि त्यांच्या साहित्याविषयीच्या तळमळीत सापडते. मर्ढेकरांचा आग्रह होता की, साहित्याला 'फाईन आर्ट' किंवा शुद्ध कला म्हणून पाहिले पाहिजे. निव्वळ अलंकारिक भाषा वापरणे किंवा रडगाणी गाणे म्हणजे साहित्य नव्हे. साहित्यात 'सौंदर्यशास्त्रीय अंतर' राखता आले पाहिजे. जोपर्यंत लेखक स्वतःच्या भावनेतून बाहेर पडून त्याकडे एका त्रयस्थ तत्त्वज्ञासारखा पाहत नाही, तोपर्यंत साहित्यात ती जागतिक 'डेप्थ' येऊ शकत नाही. त्यांच्या मते, भारतीय साहित्यात विशुद्ध प्रायोगिकता आणि बौद्धिक खोली कमी पडते, ज्यामुळे आपण जागतिक स्पर्धेत मागे पडतो.
भारतीयांसाठी आत्मपरीक्षणाची वेळ
ॲन कार्सन यांनी ज्या ताकदीने प्राचीन ग्रीक परंपरेला आधुनिकतेच्या साच्यात ढालून जागतिक साहित्यात आपले नाव कोरले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या या यशातून भारतीय लेखकांनी खूप काही शिकण्यासारखे आहे. भारताकडेही रामायण, महाभारत यांसारखी महाकाव्ये, अनेक प्राचीन मिथके आणि उपनिषदांसारख्या तत्त्वज्ञानाची मोठी खाण आहे. पण ही समृद्ध परंपरा केवळ 'जशीच्या तशी' मांडण्यासाठी किंवा तिचे गोडवे गाण्यासाठी न वापरता, तिला आजच्या आधुनिक, गुंतागुंतीच्या मानवी अस्तित्वाशी आणि जागतिक सौंदर्यशास्त्राच्या मुशीत घडवून नव्या स्वरूपात जगासमोर मांडण्याची गरज आहे.केवळ प्रादेशिकतेच्या कोंडीत न अडकता, जागतिक मानवी वेदनेला भिडणारे विषय हाताळले पाहिजेत. बा. सी. मर्ढेकरांनी सांगितल्याप्रमाणे साहित्याकडे 'शुद्ध कला' म्हणून पाहण्याची बौद्धिक दृष्टी आणि त्याला चांगल्या जागतिक दर्जाच्या इंग्रजी अनुवादांची जोड जर आपल्या लेखकांना मिळाली, तर भविष्यात नक्कीच एखाद्या भारतीय साहित्यिकाला नोबेल पुरस्काराचा हा सर्वोच्च सन्मान पुन्हा एकदा प्राप्त होईल, अशी आशा आपण बाळगूया.