नागपूर,
Arnab's blow to eastern Vidarbha बंगालच्या उपसागरात तयार झालेले अर्णब चक्रीवादळ आता अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम पूर्व किनारपट्टीसह महाराष्ट्रातील काही भागांवरही जाणवणार आहे. सध्या ताशी ७० किलोमीटर वेगाने पुढे सरकणारे हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. किनाऱ्याजवळ पोहोचताना त्याचा वेग वाढून ताशी ११५ ते १२५ किलोमीटर आणि काही ठिकाणी ताशी १४० किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. बुधवारी दुपारनंतर बपतला आणि विशाखापट्टणमदरम्यान हे वादळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, काही भागांतील शाळाही बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसला तरी त्याच्या प्रभावामुळे राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. नागपूरसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. बुधवारी विदर्भातील बहुतांश भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळू शकतात. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी बदलत्या हवामानाचा विचार करून आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाबरोबरच अरबी समुद्रातील हवामानातही बदल होण्याचे संकेत आहेत. या दोन्ही हवामानविषयक घडामोडींमुळे वातावरणातील आर्द्रता वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवरही होऊ शकतो. मुंबईसह कोकणातील काही भागांत ३१ ऑक्टोबरला हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, अर्णब चक्रीवादळाचे केंद्र अंदमान बेटांवरील विजयपूरमपासून ६२० किलोमीटर वायव्येकडे, ओडिशातील गोपाळपूरपासून ५८० किलोमीटर आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून ६१० किलोमीटर आग्नेय दिशेला होते. वायव्य दिशेने पुढे सरकत असताना वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने पूर्व किनारपट्टीवरील परिस्थितीवर हवामान विभागाचे लक्ष आहे.