श्री क्षेत्र डव्हा येथे प.पू. विश्वनाथ बाबांचा ४७ वा पुण्यतिथी महोत्सव

५ ते ११ नोव्हेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
मालेगाव,
param-pujya-vishwanath-baba तालुयातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र डव्हा येथे श्री नाथ नंगे महाराज संस्थानच्या वतीने संत विश्वनाथ बाबा यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य सात दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ५ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत हा महोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडणार असून, या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. महोत्सवाच्या सांगता ११ नोव्हेंबर रोजी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
param-pujya-vishwanath-baba
 
संतपरंपरेचा वारसा जपणार्‍या श्री क्षेत्र डव्हा येथे दरवर्षी संत विश्वनाथ बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. यंदाही संस्थानच्या वतीने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून, सात दिवस चालणार्‍या या धार्मिक पर्वात परिसरातील तसेच जिल्ह्याबाहेरील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. महोत्सवाच्या सातही दिवसात पहाटे काकडा आरतीने धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. त्यानंतर गाथा भजन, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन यांसह विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संतांच्या अभंगांचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि कीर्तनातून होणारे प्रबोधन यामुळे संपूर्ण डव्हा नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. ११ नोव्हेंबर हा सांगता दिवस संत विश्वनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. या दिवशी विशेष धार्मिक विधी आणि विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन आले आहे.
 
 
प.पू. विश्वनाथ बाबा यांच्या अध्यात्मिक विचारांचा प्रसार करणे, भक्तीभाव वृद्धिंगत करणे, सामूहिक साधनेची परंपरा जोपासणे आणि संतविचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, हा या महोत्सवाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक समाधान मिळण्याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचाही संदेश या सोहळ्यातून दिला जाणार आहे. दरम्यान, सात दिवस चालणार्‍या या पुण्यतिथी महोत्सवासाठी श्री नाथ नंगे महाराज संस्थानच्या वतीने आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. बाहेरगावाहून येणार्‍या भाविकांनाही या धार्मिक सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी संस्थानकडून नियोजन केले जात आहे. प.पू.विश्वनाथ बाबा यांच्या ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन, श्रवण आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री नाथ नंगे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.