हिमस्खलनाने केदारताल ट्रेक अडवला; आठ जण अडकले

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
डेहराडून,
Avalanche blocks Kedartal trek केदारताल ट्रेक मार्गावर हिमस्खलन झाल्याने सात ट्रेकर्ससह एकूण आठ जण अडचणीत सापडले आहेत. भोजखडकच्या पुढील भागात हिमस्खलन झाल्यामुळे या आठ जणांचा मार्ग बंद झाला असून ते दुर्गम परिसरात अडकले आहेत. दरम्यान, कच्ची ढांगजवळ तीन पोर्टर आणि एका स्वयंपाक्याचा समावेश असलेले चार जण सुरक्षित आढळले आहेत. अडकलेल्या सदस्यांना बाहेर काढण्यासाठी शनिवारी एनडीआरएफ, एसडीआरएफ, वन विभाग आणि ट्रेकिंग एजन्सीच्या पथकांनी संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. घटनास्थळाचा परिसर दुर्गम असल्याने बचावकार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज पडल्यास हेलिकॉप्टरची मदत घेण्यासाठीही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
 
 
 
fy60
 
जिल्हा आपत्कालीन परिचालन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी गंगोत्री येथून सात ट्रेकर्स आणि सहा सपोर्टिंग स्टाफ अशा एकूण १३ सदस्यांचे पथक केदारताल ट्रेकसाठी रवाना झाले होते. या पथकाने २९ ऑक्टोबर रोजी परतणे अपेक्षित होते. मात्र, खराब हवामान, हिमनदी आणि सततच्या बर्फवृष्टीमुळे ट्रेकिंगचा मार्ग अडवला गेला. निर्धारित वेळेत पथक परतले नाही, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर ३० ऑक्टोबर रोजी ट्रेकिंग एजन्सीच्या माध्यमातून फोनवर संपर्क झाला. त्यावेळी पथकातील सदस्यांनी कच्ची ढांग परिसरात सुरक्षित असल्याची माहिती देत मदतीची मागणी केली होती.
 
 
त्यानंतर बचाव यंत्रणांनी परिस्थितीचा आढावा घेत अडकलेल्या सदस्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोहीम हाती घेतली. कच्ची ढांगजवळ चार जण सुरक्षित आढळल्याने त्यांच्याबाबत दिलासा मिळाला असला, तरी भोजखडकच्या पुढे अडकलेल्या आठ जणांना सुरक्षित बाहेर काढण्याचे मोठे आव्हान बचाव पथकांसमोर आहे. हिमस्खलनामुळे मार्ग बंद झाल्याने आणि परिसर दुर्गम असल्याने बचावकार्य काळजीपूर्वक राबवले जात आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, वन विभाग आणि ट्रेकिंग एजन्सीची पथके या मोहिमेत सहभागी झाली आहेत.