मुंबई
Dhindora ओटीटीवर दर आठवड्याला अनेक नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र, नव्या कलाकृतींच्या गर्दीत एखादी जुनी सीरिज पुन्हा चर्चेत येऊन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते, असेही घडते. सध्या असाच अनुभव अभिनेता आणि कंटेंट क्रिएटर भुवन बाम याच्या ‘ढिंढोरा’ या कॉमेडी-ड्रामा सीरिजला मिळत आहे. २०२१ मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झालेली ही सीरिज आता नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शित होऊन काही वर्षे उलटली असतानाही या सीरिजची लोकप्रियता कायम असल्याचे यावरून दिसून येते.
‘ढिंढोरा’ला IMDb वर ८.७ इतके प्रभावी रेटिंग मिळाले आहे. या सीरिजच्या कथेत एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे आयुष्य केंद्रस्थानी आहे. या कुटुंबातील बबलूला अचानक मोठी लॉटरी लागते आणि एका क्षणात त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळते. लॉटरीतून मिळालेल्या पैशांच्या जोरावर ऐषोआरामाचे जीवन जगण्याची स्वप्ने कुटुंबातील सदस्य पाहू लागतात. इतकेच नव्हे, तर अचानक आलेल्या पैशांमुळे नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या वागण्यातही बदल होऊ लागतो.
मात्र, या आनंदाचा प्रवास फार काळ सुरळीत राहत नाही. एका अपघातानंतर बबलूची स्मरणशक्ती जाते आणि संपूर्ण कुटुंबासमोर अनेक अडचणी निर्माण होतात. या गोंधळात बबलूचा मुलगा स्वतःच्या गायक होण्याच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत असतो. दुसरीकडे, टिटू मामासारख्या रंगतदार आणि अतरंगी पात्रांमुळे कथेत विनोदाचे अनेक प्रसंग पाहायला मिळतात. कौटुंबिक नातेसंबंध, अचानक बदललेले आयुष्य आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंमतीजमती यांची मनोरंजक सांगड या सीरिजमध्ये घालण्यात आली आहे.
‘ढिंढोरा’चे सर्वात मोठे Dhindora आकर्षण म्हणजे भुवन बामचा बहुरंगी अभिनय. त्याने या एकाच सीरिजमध्ये तब्बल नऊ वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. बबलू, टिटू मामा, बंचो आणि समीर फुद्दी यांसारख्या पात्रांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेची देहबोली, बोलण्याची पद्धत आणि विनोदाची शैली वेगळी ठेवण्यात भुवनला यश आले आहे. एकाच कलाकाराने इतक्या वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रत्येक पात्राला स्वतंत्र ओळख मिळवून देणे हे या सीरिजचे खास वैशिष्ट्य ठरले आहे.
भुवनच्या अभिनयाबरोबरच त्याची विनोदाची अनोखी शैली आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील नात्यांचे वास्तववादी चित्रण प्रेक्षकांना भावले आहे. २०२१ मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झालेल्या पहिल्या सीझनला त्यावेळीही मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाल्यामुळे या सीरिजला नव्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, पहिल्या सीझनच्या लोकप्रियतेनंतर चाहत्यांना आता ‘ढिंढोरा’च्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा लागली आहे.