मुंबई
Kanika Mann ‘बिग बॉस २०’मधील स्पर्धक सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी माही विजने घटस्फोट आणि पोटगीबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा झाली होती. आता या कार्यक्रमातील स्पर्धक कनिका मान हिनेही तिच्या आयुष्यातील एका कटू अनुभवाचा खुलासा केला आहे. कॉलेजमध्ये असताना सुरू झालेल्या पहिल्याच प्रेमसंबंधात तिला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला होता. कनिकाने इतर स्पर्धकांशी बोलताना या नात्यातील धक्कादायक प्रसंग सांगितले.
कनिकाने सांगितले की, कॉलेजच्या पहिल्या वर्षातच तिच्या आयुष्यात पहिला बॉयफ्रेंड आला. इतर मुलींना रात्री उशिरापर्यंत त्यांच्या प्रियकरांशी बोलताना पाहून तिलाही तसेच करावेसे वाटले. त्यामुळे तिने फेसबुकवर अकाउंट तयार केले. या माध्यमातून तिची एका मुलाशी ओळख झाली आणि तोच तिचा पहिला बॉयफ्रेंड बनला. मात्र, पुढे हे नाते तिच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरले. कनिकाने त्या तरुणाचा उल्लेख ‘सायको’ असा केला.
या नात्यातील हिंसक Kanika Mann वागणुकीबद्दल सांगताना कनिकाने म्हटले की, तिचा एक्स बॉयफ्रेंड अनेकदा तिच्या वर्गात यायचा. एकदा तिने सिंगल स्ट्रॅप असलेला ड्रेस घातल्यामुळे त्याने सर्वांसमोर तिच्या कानशिलात लगावली होती. त्यावेळी कनिकाने नुकतेच पियर्सिंग केले होते. मारहाणीमुळे त्या जागेवरून रक्तही वाहू लागले होते. इतकेच नव्हे, तर त्याने तिच्याशी मारहाणही केली; मात्र त्या वेळी तिच्या मदतीला कोणीही पुढे आले नाही.
कनिकाने सांगितले की, त्याच्यासोबत कुठे जाण्यास नकार दिल्यास तो तिच्या वडिलांना फोन करण्याची धमकी द्यायचा. एकदा त्याने तिच्या वडिलांना फोनही केला होता; मात्र त्यांनी तो उचलला नाही. याबद्दल बोलताना कनिका म्हणाली की, वडिलांनी त्यावेळी फोन उचलला असता, तर कदाचित त्या नात्यातून तिची लवकर सुटका झाली असती.
या त्रासातून बाहेर पडण्यासाठी कनिकाने कायदेशीर बाबी समजून घेतल्या. सुमारे आठ-नऊ महिने कायद्याचा अभ्यास केल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी तिच्या लक्षात आल्या आणि त्याच आधारावर तिने त्या नात्याचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिचा एक्स बॉयफ्रेंड तिचा पाठलाग करत असल्याचेही तिने सांगितले. हॉस्टेलपासून ते तिच्या विभागापर्यंत तो तिच्या मागावर असायचा.
एका प्रसंगाचे वर्णन करताना कनिकाने सांगितले की, ती इमारतीत प्रवेश करत असताना त्याने तिचा हात पकडून तिला ओढले. थंडीचे दिवस असल्याने त्याने हुडी घातली होती. त्याच्याकडे चाकूही होता. त्याने चाकू काढून स्वतःच्या हातावर तीन ते चार वेळा खोल वार केले. त्यानंतर तिचे केस पकडून तो तिच्या भांगात सिंदूर भरण्याची भाषा करू लागला.
या प्रकारामुळेKanika Mann घाबरलेल्या कनिकाने तातडीने जवळच्या एका व्यक्तीला पोलिसांना बोलावण्यास सांगितले. त्या व्यक्तीने पोलिसांना फोन केल्यानंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड घाबरला. या प्रकरणानंतर त्याला दोन ते तीन दिवस तुरुंगात राहावे लागले. मात्र, त्यानंतरही त्याच्या कुटुंबीयांकडून कनिकाला धमकावले जात असल्याचा दावा तिने केला.
या संपूर्ण काळात आपल्या कुटुंबाला या छळाबद्दल सांगण्याचीही तिला भीती वाटत होती. मात्र, कठीण प्रसंगात साथ दिल्याबद्दल कनिकाने कुटुंबीयांचे आभार मानले. ‘बिग बॉस २०’मध्ये तिने सांगितलेल्या या अनुभवामुळे तिच्या खासगी आयुष्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.