अनिल कांबळे
नागपूर,
firecracker sellers सार्वजनिक रस्त्यावर फटाके फोडून ध्वणी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश असताना पोलिस विभागाने फटाके विक्री आणि वितरण करणाऱ्यांना परवाने दिले. किती फटाके विक्रेत्यांना परवाने दिले आणि त्या विक्रेत्यांना कोणत्या अटींसह परवाने दिले, अशी मौखिक विचारणा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पोलिस विभागाला केली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी पोलिस आयुक्तांना येत्या ३ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत.
सण आणि उत्सवांच्या काळात सार्वजनिक रस्त्यांवर अनियंत्रितपणे वाजवले जाणारे डीजे, साऊंड सिस्टीम आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची गंभीर दखल घेत हायकोर्टाने २३ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले होते. यानंतरही सार्वजनिक रस्त्यावर फटाके फोडण्यात आले. कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. फटाके विक्रेत्यांना व वितरकांना परवाने कसे काय देण्यात आले?, पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द काय कारवाई केली, अशी विचारणा न्यायालयाने पोलिस विभागाला करीत येत्या ३ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. याप्रकरणी ४ नोव्हेंबरला सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. उत्सवांच्या काळात सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडल्यास, डिजे वाजविल्यास या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित मंडळ, डीजे मालक यांच्याविरूध्द कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने पोलिस आयुक्तांना मागील सुनावणीत दिले होते. या सर्व नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलिस आयुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त व कनिष्ठ पोलिस अधिकारी जबाबदार राहणार असल्याचे मौखिकपणे कोर्टाने म्हटले होते.firecracker sellers या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्याचे आदेश पोलिस विभागाला दिले होते. या नियमांचे सक्तीने पालन झालेच पाहिजे, पालन न झाल्यास संबंधित पोलिस अधिकारी जबाबदार राहतील, असे न्यायालयाने मौखिकपणे म्हटले होते. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. आशुतोष धर्माधिकारी, अॅड. तुषार मंडलेकर, कोर्ट मित्र अॅड. अब्दुल सुभान, मध्यस्थीतर्फे अॅड. गुरूशरण सिंग, सरकारतर्फे अॅड. नितीन राव , अॅड. शिशीर उके यांनी बाजू मांडली.
पोलिस आयुक्तांच्या घरासमोरच नियमांचे उल्लंघन
मागील १५ दिवसांच्या काळात नियमांचे उल्लंघन झाले आहे. कोर्टाचे आदेश पाळण्यात आले नाही. स्वत: आम्ही पाहिले आहे, असेही न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके मौखिकपणे शुक्रवारी सुनावणीदरम्यान म्हणाल्या. पोलिस आयुक्तांच्या घरासमोरच मॉडिफाईड सायलेन्सर असणारे बुलेट हे फटाक्यांचा आवाज करून नियमांचे उल्लंघन करीत असतात. यासर्व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरूध्द काय कारवाई करीत आहात, संबंधितांविरूध्द काय पावले उचलली. नियमांचे उल्लंघन करणारे फटाके निर्मितीचे कारखाने शोधून काढा, असेही कोर्टाने मौखिकपणे नमूद करीत आपण फटाके विक्रेत्यांना परवाने दिले असल्याचे प्रशासनाला म्हटले आहे.