लातूरमध्ये खळबळ...कुरिअर पार्सलचा अचानक स्फोट!

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
लातूर,
Courier parcel explodes in Latur नेहमीप्रमाणे कुरिअरच्या सामानाची वाहतूक आणि चढ-उतार सुरू असताना अचानक झालेल्या स्फोटाने लातूर शहरातील उद्योग भवन परिसर हादरला. येथील उमाटे कुरिअर सर्व्हिसमध्ये आलेल्या एका पार्सलचा शनिवारी भीषण स्फोट झाला. या घटनेत पार्सल उतरवण्याचे काम करणारा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की कुरिअरच्या वाहनाचे छत आणि काचा उडून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नेहमीच्या कामकाजादरम्यानच हा प्रकार घडल्याने कुरिअरमधील कर्मचारी आणि संचालकांनाही धक्का बसला आहे.
 
 
 
latur
 
घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांचे पथक आणि श्वान पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. स्फोट झालेल्या पार्सलचा स्रोत, ते कोणी पाठवले होते आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे साहित्य होते, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, कुरिअरच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरून कार्यालयात येणाऱ्या पार्सलमधील साहित्याची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नसते. मात्र, त्यांच्या कार्यालयातून बाहेर पाठवल्या जाणाऱ्या पार्सलमधील वस्तूंची माहिती ठेवली जाते. त्यामुळे संबंधित पार्सल कुठून आले होते, याची माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे.
 
 
दररोजच्या कामकाजात कोणतीही असामान्य बाब जाणवली नसताना अचानक पार्सलचा स्फोट झाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. जखमी कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, स्फोटामुळे वाहनाचे झालेले नुकसान आणि पार्सलमधील साहित्याबाबत निर्माण झालेले प्रश्न यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. संबंधित पार्सल पाठवणाऱ्याची ओळख, त्यातील साहित्य आणि स्फोटामागील नेमके कारण तपासातूनच स्पष्ट होणार आहे.