वॉशिंग्टन,
Death of an Indian-origin woman in America अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात ऑगस्ट महिन्यापासून बेपत्ता असलेल्या भारतीय वंशाच्या अजीत कौर यांचा मृतदेह अखेर आढळला आहे. सेरेस शहरातील कालव्यामध्ये गस्त घालत असलेल्या एका कर्मचाऱ्याला हा मृतदेह दिसला. सेरेस पोलीस विभागाने मृतदेहाची ओळख अजीत कौर अशी असल्याचे स्पष्ट केले. त्यांचा मृतदेह स्टॅनिस्लॉस काउंटी कोरोनर कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. तेथे २७ ऑक्टोबर रोजी त्यांची ओळख निश्चित करण्यात आली. अजीत कौर २३ ऑगस्ट २०२६ रोजी सेरेस येथील कासा ग्रांडे अपार्टमेंट परिसरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्याच दिवशी पहाटे सुमारे १ वाजून ४५ मिनिटांनी त्या शहरातील व्हिटमोर अव्हेन्यू आणि मिशेल रोडजवळ शेवटच्या वेळी दिसल्या होत्या.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना २४ ऑक्टोबर, शनिवारी टरलॉक इरिगेशन डिस्ट्रिक्ट (टीआयडी) मधील एका कर्मचाऱ्याला सेंट्रल अव्हेन्यू आणि कीज रोड परिसरातील 'लोअर लॅटरल ३' या कालव्यात मृतदेह आढळला. संबंधित कर्मचारी नियमित गस्त घालत असताना ही बाब समोर आली. या भागातील कालव्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी टीआयडीकडे आहे. तपास अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, अजीत कौर अपार्टमेंट परिसराच्या पूर्वेकडे असलेल्या टीआयडीच्या कालव्यापर्यंत पोहोचल्या असाव्यात. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. सेरेस शहरातील कालव्यांच्या आसपासच्या परिसराची तपासणी करण्यात आली होती. तसेच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रशिक्षित 'के-९' श्वानपथकाची मदत घेण्यात आली होती. हे पथक मर्सिड काउंटी शेरिफ कार्यालयाकडून मागवण्यात आले होते.
शोधमोहिमेत स्टॅनिस्लॉस काउंटी शेरिफ विभागाच्या गोताखोर पथकानेही सहभाग घेतला होता. कालव्यांमधील शोधासाठी पाण्याखाली काम करणाऱ्या रिमोट सोनार ड्रोनचा वापर करण्यात आला. तपास अधिकाऱ्यांनी टीआयडीच्या सहकार्याने अजीत कौर कोणत्या जलमार्गातून संबंधित ठिकाणी पोहोचल्या असाव्यात, याचा नकाशा तयार केला. त्या टीआयडीच्या पाणी नियंत्रित करणाऱ्या जलाशयापर्यंत पोहोचल्या होत्या का, याचीही पडताळणी करण्यात आली. या घटनेनंतर सेरेस पोलीस विभागाने अजीत कौर यांच्या कुटुंबीयांप्रति आणि जवळच्या व्यक्तींबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. शोध आणि तपास मोहिमेत मदत करणाऱ्या सर्व यंत्रणा व कर्मचाऱ्यांचेही पोलिसांनी आभार मानले.