बुलढाणा
dr-rajendra-shingane शरद पवार काँग्रेस पक्षाबाबत विरोधकांकडून नेहमीच वेगवेगळ्या वावड्या उठविल्या जातात. मात्र, प्रत्येक वेळी पक्षाने आपले अस्तित्व आणि कर्तृत्व सिद्ध केले आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ, असा विश्वास विदर्भ प्रभारी तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विस्तारित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्त ३० ऑटोबर रोजी बुलढाण्यातील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे निरीक्षक प्रा. विश्वनाथ कांबळे अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, प्रसेनजीत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी तसेच डॉ. राजेंद्र शिंगणे यांची जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी करण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या वतीने डॉ. शिंगणे यांचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. स्थापन आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी गाव तेथे राष्ट्रवादीची शाखा करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच युवक, विद्यार्थी, महिला, अल्पसंख्याक, शेतकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी पदाधिकार्यांनी सक्रियपणे काम करावे, अशा सूचनाही दिल्या.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अॅड. साहेबराव सरदार, प्रदेश उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, भास्करराव काळे, माजी सभापती रियाज खान, डॉ. ज्योतीताई खेडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला माजी आमदार नानाभाऊ कोकरे, शिक्षक प्रदेशाध्यक्ष राम राठोड, प्रदेश सरचिटणीस संतोषराव रायपुरे, बी. टी. जाधव, रामभाऊ जाधव, अभय चव्हाण, दिनकरराव देशमुख, लक्ष्मी शेळके, शीतल पाटील, आत्माराम कार्यदे, वर्षाताई इंगळे, नाझीमाताई खान, युवक प्रदेश उपाध्यक्ष अॅड. योगेश नाईक, अॅड. पी. एम. जाधव, सतीश भुतेकर, जिया उलक, आफताफ खान, तात्या कृपाळ पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.