चारा टंचाई निवारणासाठी ४९१ ग्रामपंचायतींमध्ये अभियान

दुष्काळाच्या झळांत पशुधनाला चार्‍याचा आधार

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
वाशीम,
scorching-impact-of-drought जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे आव्हान निर्माण होण्याची शयता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागामार्फत चारा साक्षरता व संवर्धन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये पशुपालकांना चारा संकलन, साठवणूक, प्रक्रिया आणि पर्यायी चारा निर्मितीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. उपलब्ध चार्‍याची नासाडी टाळून त्याचा प्रभावी वापर करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
 
 
washim
 
खरीप हंगामातील पावसाची तूट आणि पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम लक्षात घेता चारा व्यवस्थापनाचे नियोजन महत्त्वाचे ठरत आहे. खरीप पिकांच्या काढणीनंतर शेतात शिल्लक राहणारे सोयाबीनचे कुटार, तुरीचे कुटार तसेच अन्य पिकांचे अवशेष योग्य पद्धतीने संकलित करून पशुखाद्य म्हणून वापरता येतात. हे अवशेष जाळण्याऐवजी त्यांची योग्य साठवणूक व शिफारशीनुसार प्रक्रिया केल्यास पशुधनासाठी उपयुक्त चारा उपलब्ध होऊ शकतो. यासाठी पशुपालकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जात आहे. चारा संवर्धन, मुरघास निर्मिती, चार्‍याची योग्य साठवणूक आणि पीक अवशेषांचे पोषणमूल्य वाढविण्याबाबत पशुपालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८ गावांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. आगामी काळातही गावपातळीवर मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
 
पशुधनाची संख्या आणि उपलब्ध चार्‍याचा साठा लक्षात घेऊन पशुपालकांनी चारा व्यवस्थापनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात ज्वारी तसेच अन्य चारा पिकांची लागवड करावी. यामुळे आगामी काळातील चारा उपलब्धता वाढविण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. तुषार बावने यांनी केले.