महात्मा गांधींच्या नातवाला ३० एकर जमीन मिळाली परत

अमेरिकेतील एका न्यायालयाचा निर्णय, २० महिन्यांच्या लढ्याला यश

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
सुरत, 
gandhi-family-wins-virginia-land-caseराष्ट्रपिता महात्मा गांधींचे नातू, दिवंगत कानु गांधी आणि त्यांच्या पत्नी शिवा गांधी यांच्या मालकीच्या जमिनीवर व्हर्जिनियातील एका रहिवाशाने केलेले अतिक्रमण हटवण्याचा आदेश अमेरिकेतील एका न्यायालयाने दिला आहे. सुरतमधील परिमल देसाई यांनी २० महिने कायदेशीर लढा देत या जमिनीवरील मालकी हक्काच्या वादात विजय मिळवला. अतिक्रमण करणाऱ्या ग्रेगरी ब्लॅक यांना जमीन रिकामी करून तिचा ताबा सोपवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. व्हर्जिनियातील वॉरेन काउंटी येथे शेनँडोह नॅशनल पार्कला लागून असलेली ही ३० एकर जमीन कनू गांधी आणि शिवा गांधी यांनी १९८७ मध्ये खरेदी केली होती.
 

mahatma 
दक्षिण गुजरातमध्ये आयुष्याची अखेरची वर्षे व्यतीत करताना या दाम्पत्याने एक धर्मादाय न्यास स्थापन करून आपली मालमत्ता त्याच्या नावे केली होती. परिमल देसाई हे सध्या या न्यासाचे व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून काम पाहतात. १० जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेचे नागरिक ग्रेगरी ब्लॅक यांनी त्यांच्या सुरतमधील निवासस्थानी कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली, असे परिमल देसाई यांनी सांगितले.
 
व्हर्जिनियातील कायद्यानुसार, काही विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यास एखाद्या व्यक्तीला १५ वर्षांच्या ताब्यानंतर जमिनीवर मालकी हक्क सांगता येतो. याच तरतुदीचा आधार घेत ब्लॅक यांनी संबंधित जमिनीवर दावा केला होता. मात्र, जमिनीचा प्रत्यक्ष ताबा आपल्याकडे असल्याचे तसेच मालकी हक्काच्या विरोधात ताबा घेतल्याचे सिद्ध करण्यात त्यांना अपयश आले.
आर्थिक संपत्ती न्यासाकडे हस्तांतरित
कनू गांधी आणि शिवा गांधी हे २०१३ मध्ये भारतात परतले होते. त्यांनी दक्षिण गुजरातमध्ये आयुष्याची अखेरची वर्षे घालवली. नोव्हेंबर २०१६ मध्ये सुरतमध्ये कनू गांधी यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्युपत्रानुसार, त्यांच्या मालमत्तेचे हक्क पत्नी शिवा गांधी यांच्याकडे आले. २०१८ मध्ये शिवा गांधी यांनी ‘द डॉ. शिवा अँड कनू रामदास मोहनदास गांधी चॅरिटेबल ट्रस्ट’ या धर्मादाय न्यासाची स्थापना केली आणि आपले मृत्युपत्र नोंदवले. धर्मादाय कार्यासाठी वापर करता यावा, या उद्देशाने शिवा गांधी यांची मालमत्ता आणि आर्थिक संपत्ती न्यासाकडे हस्तांतरित झाली.