दिवाळी फराळासह महिला बचत गटांच्या वस्तूंची पर्वणी

स्थानिक उत्पादनांच्या खरेदीतून महिला सक्षमीकरणाला हातभार

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
 
गोंदिया,
gondia-diwali-faral-exhibitionदिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा अभियान कक्षाच्या वतीने गोंदियात २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान ‘दिवाळी फराळ व वस्तू महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे आयोजित या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना दिवाळी खरेदीची संधी मिळणार असून, महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनालाही प्रोत्साहन मिळणार आहे.
 
 
faral
 
 
महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेल्या चकली, करंजी, लाडू, चिवडा यांसह विविध पारंपरिक दिवाळी फराळाचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. यासोबतच आकर्षक आकाशकंदील, घरगुती सजावटीच्या वस्तू, पूजासाहित्य आणि महिलांच्या हस्तकौशल्यातून तयार केलेल्या विविध कलावस्तूंचे स्टॉलही महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहेत. महिला उद्योजिकांना मिळणार प्रोत्साहनग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूंना ग्राहक मिळावेत, त्यांच्या उत्पादनांचा प्रसार व्हावा आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी संधी मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
 
 
स्थानिक उत्पादनांना नागरिकांनी पसंती दिल्यास महिला बचत गटांच्या व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. दिवाळीच्या खरेदीत स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य देत नागरिकांनी महोत्सवाला भेट द्यावी. फराळ व विविध वस्तूंची खरेदी करून महिला उद्योजिकांच्या मेहनतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन उमेद अभियानाच्या जिल्हा अभियान कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.