पंचकुला,
mahipal-dhanda हरियाणातील पंचकुला येथील सरकारी शाळेत एका चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेत चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा हरियाणाचे शिक्षणमंत्री महिपाल धांडा यांनी दिला आहे.
पंचकुलातील सेक्टर २० परिसरात असलेल्या शहीद मेजर अनुज राजपूत गव्हर्नमेंट मॉडेल संस्कृती सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये ही घटना घडली. येथे केजीमध्ये शिकणाऱ्या एका चिमुकल्या विद्यार्थिनीवर तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने विटेने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये संबंधित विद्यार्थी मुलीवर विटेने हल्ला करताना दिसत आहे. या प्रकारानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाने चौकशीची प्रक्रिया सुरू केली. सरकारने मुख्यालय स्तरावर समिती स्थापन केली असून, या समितीला संपूर्ण प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिक्षणमंत्री महिपाल धांडा यांनी सांगितले की, सरकार या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. प्रकरण निदर्शनास येताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. समितीचा अहवाल संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मिळण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री धांडा यांनी पुढे सांगितले की, चौकशीदरम्यान कोणत्याही व्यक्तीचा निष्काळजीपणा समोर आल्यास त्याला जबाबदार धरले जाईल. मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.