वर्धा,
encroachments शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने शुक्रवारी मोहीम सुरू केली. दरम्यान, शिवाजी चौकातील अतिक्रमण काढत असताना कर्मचारी आणि अतिक्रमणधारकांमध्ये वाद निर्माण झाला. एक तास चाललेल्या या गोंधळानंतर प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. नगर परिषद कर्मचार्याच्या तक्रारीवरून संबंधित अतिक्रमणधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\ शहरात सर्वत्र अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला असून, अनेक दुकानदारांनी आपली दुकाने रस्त्यापर्यंत वाढविली आहे. काही व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला साहित्य तसेच हातगाड्या ठेवल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नगर परिषद प्रशासनाकडून वेळोवेळी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते. मात्र, या मोहिमेत सातत्य नसल्याने काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमण जैसे थे होत असल्याचे चित्र आहे. मागील महिन्यातही प्रशासनाने कारवाई करून रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण हटविले होते. मात्र, दोन ते तीन दिवसांतच पुन्हा अतिक्रमण वाढल्याचे दिसून आले. नगर परिषद प्रशासनाकडे आरती चौक ते शिवाजी चौक या मार्गावरील अतिक्रमणाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या.
त्यानुसार शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटविताना प्रशासनाने १८ ते २० टपर्या जप्त केल्या. कारवाई करणारे पथक शिवाजी चौकात पोहोचल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेला ठेला जप्त करण्यात आला. यानंतर संबंधित अतिक्रमणधारक घटनास्थळी पोहोचला आणि कारवाईला आक्षेप घेत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे नगर परिषद कर्मचारी आणि अतिक्रमणधारक आमनेसामने आले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी नगर परिषद कर्मचार्याने दिलेल्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ करणे तसेच मारहाणीची धमकी देणे आदी आरोपांखाली संबंधित अतिक्रमणधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.