तेहरान,
Iran's proposal to the United States अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. दोन्ही देशांमधील चर्चेच्या प्राथमिक आराखड्यात इराणने आपल्या उच्च संवर्धित युरेनियमचा साठा तिसऱ्या देशाकडे हस्तांतरित करणे किंवा त्याचे संवर्धन कमी करणे, तसेच होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जहाज वाहतुकीसाठी खुली करण्याचा प्रस्ताव असल्याचे वृत्त आहे. अल अरबिया इंग्लिशने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक करार झाल्यानंतर सात दिवसांच्या आत ही सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. या कराराची अंमलबजावणी आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी चीनला संभाव्य हमीदार बनवण्याबरोबरच बैठकीचे आयोजन करण्याची जबाबदारीही देण्याचा विचार आहे. वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील थेट चर्चा इस्तंबूलऐवजी दोहा येथे होण्याची शक्यता असून, अमेरिकेने निर्बंध, नाकेबंदी आणि आर्थिक बंधने शिथिल करण्याच्या बदल्यात इराणने आपल्या अणुकार्यक्रमावर आणि सागरी सुरक्षेबाबत ठोस आश्वासने द्यावीत, असा या आराखड्याचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक टप्प्यावर दोन्ही देशांच्या वचनबद्धतेची स्वतंत्र पडताळणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची तरतूदही प्रस्तावात आहे.

दरम्यान, इराण आणि अमेरिकेदरम्यान युद्धविरामासाठी कतारने राजनैतिक प्रयत्न तीव्र केले आहेत. इराणची सरकारी वृत्तसंस्था इर्नाच्या माहितीनुसार, कतारचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ शुक्रवारी सकाळी तेहरानमध्ये दाखल झाले. कतारच्या पंतप्रधानांचे वरिष्ठ सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ अमेरिकेच्या समन्वयाने काम करत आहे. कतारच्या प्रतिनिधींनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांचे पत्र इराणचे सुरक्षा अधिकारी मोहसेन रझाई यांच्याकडे सुपूर्द केल्याचेही वृत्त आहे. अमेरिकेचे लष्करी हल्ले टाळण्यासाठी राजनैतिक मार्ग शोधण्याचा प्रस्ताव या पत्रातून मांडण्यात आल्याचे सांगितले जाते. इराणने या पत्राचे स्वागत केल्याची माहितीही समोर आली आहे. दुसरीकडे, तुर्कस्ताननेही या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिकेत झालेल्या जी-२० मंत्रिस्तरीय बैठकीदरम्यान तुर्कस्तानचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांची भेट घेतली. या चर्चेत अमेरिका-इराणमधील वाटाघाटी, प्रादेशिक घडामोडी आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. यापूर्वी तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली होती. त्यावेळी अंकाराने सागरी मार्गांबाबत चिंता व्यक्त करत तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला होता.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकेला कोणतीही घाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी इराणला चर्चेत रस असल्याचा दावा केला. मात्र, इराण आर्थिक संकटात असून आपल्या सैनिकांना आणि पोलिसांना वेतन देण्याचीही क्षमता त्यांच्याकडे नसल्याचे ट्रम्प म्हणाले. ते म्हणाले, ''चर्चा सुरू आहे. त्यांना बोलायचे आहे. ते सतत बोलत आहेत. मात्र, त्यांना आपल्या सैनिकांना आणि पोलिसांना पगार देता येत नाही. ते मोठ्या संकटात आहेत. त्यामुळे आमच्याकडे पुरेसा वेळ आहे.'' या संघर्षाचे वर्णन करताना त्यांनी हा सामान्य प्रकारचा युद्धसंघर्ष नसल्याचेही नमूद केले. अमेरिका गेल्या सात महिन्यांपासून या परिस्थितीचा सामना करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लष्करी कारवाईवर होणारा अमेरिकेचा आर्थिक खर्च नगण्य असल्याचा दावा करत अन्य ठिकाणांहून मिळालेल्या फायद्यांमुळे हा खर्च भरून निघाल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे अमेरिका-इराण चर्चेतील पुढील घडामोडी आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत होणारा निर्णय याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.