इटलीत पुन्हा आंदोलकांचा धुमाकूळ

शासकीय इमारती, वाहनांची जाळपोळ, शिक्षणासाठी वाढीव सरकारी निधीची मागणी

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
रोम,
italy-student-protestsशिक्षणासाठी वाढीव सरकारी निधी, शुल्कात कपात आणि परवडणारी वसतिगृहे मिळावी या मागणीसाठी शनिवारी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थी आंदोलकांनी इटलीत धुमाकूळ घातला. पोलिसांच्या विरोधाला झुगारून आंदोलनकर्त्यांनी शासकीय इमारती, वाहने आणि मालमत्तांची जाळपोळ आणि तोडफोड केली. सरकारने चर्चेची तयारी दाखवूनही आंदोलकांचा उद्रेक सुरूच आहे. पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात २५ लोक जखमी झाले.

itli 
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शनिवारी हजारो विद्यार्थी, मजूर आणि कामगार संघटना राजधानी रोम आणि इतर शहरात रस्त्यांवर उतरल्या. देशातील ४० पेक्षा अधिक शहरात आंदोलन सुरू करत त्यांनी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी आंदोलकांना चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन केले. मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. सरकारच्या लष्करी खर्च वाढवण्याच्या धोरणाला आणि युद्धक्षेत्रात शस्त्रे पाठवण्यासाठी बंदरांचा वापर करण्यालाही आंदोलनकर्त्यांनी विरोध केला आहे. ‘युनियन सिंडाकेल दी बेस’ (यूएसबी) या कामगार संघटनेने पुकारलेल्या २४ तासांच्या संपाचा भाग म्हणून हे देशव्यापी आंदोलन सुरू आहे.
संसदेत घुसण्याच प्रयत्न उधळला
बहुतांश ठिकाणी आंदोलने शांततापूर्ण राहिली असली तरी काही शहरांमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणाव असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी पाण्याचे फवारे वापरले. संसदेच्या दिशेने कूच करणाऱ्या जमावाला रोखत त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचा संसदेत घुसण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला.
शाळा- शैक्षणिक संस्थांसमोर निदर्शने
आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी अनेक शहरांमधील शाळा आणि शैक्षणिक संस्थांसमोर निदर्शने केली. काहींनी सरकारचा निषेध करण्यासाठी विद्यापीठांसमोर तंबू उभारले. रोममधील २१ वर्षीय विद्यार्थिनी बीट्रिस चिलेली हिने वृत्तसंस्थेशी बोलताना
सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती अत्यंत कठीण झाली आहे. जास्त शुल्क आणि भाडे भरणे शक्य होत नाही आणि याचा भार पालकांवर पडत आहे. विद्यार्थी वसतिगृहातील एका खोलीचे भाडे दरमहा १,२०० युरोपर्यंत पोहोचल्याने आर्थिक भार वाढला.
बॉम्ब नकोत, घरे हवीत
राजधानी रोममध्ये हजारो आंदोलकांनी मध्यवर्ती टर्मिनी रेल्वे स्थानकापासून मोर्चाला सुरुवात केली. झेंडे आणि बॅनर घेतलेले आंदोलक कोलोसियमजवळून जात असताना पोलिसांसोबत संघर्ष झाला, यात २५ नागरिक गंभीर जखमी झाले. यावेळी आम्हाला बॉम्ब नको, अधिक घरे हवीत, अशा घोषणाबाजी केली. गाझावरील बॉम्बहल्ल्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांची व्यथा दाखवण्यासाठी काही आंदोलकांनी एक पथनाट्यही सादरीकरण केले.
कचऱ्याच्या पेट्या ठेवून लावली आग
अनेक शहरांमधील आंदोलनात पॅलेस्टाईन-समर्थक झेंडेही दिसले. काही लोकांनी रस्त्यावर कचऱ्याच्या पेट्या ठेवून त्यांना आग लावली. शांततेचे आवाहन करताना पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटले की, तरुणांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास सरकार कटिबद्ध आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रस्ताव तयार केला आहे, यातून ज्या तरुणांना सरकार आपली पर्वा करत नाही असे वाटते, त्यांना उत्तरे मिळतील. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना सरकारची मदत लागू होणार नाही.