जुरेलचे शतक एका धावेवर!

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
क्राइस्टचर्च,
jurels-century-one-run-away न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर सात गडी गमावत २९१ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय डावाची सुरुवात निराशाजनक झाली असताना कर्णधार ध्रुव जुरेलने संयमी आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर संघाला सावरले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जुरेल ९९ धावांवर नाबाद होता. त्यामुळे त्याचे शतक पूर्ण होण्यासाठी आता केवळ एका धावेची प्रतीक्षा आहे.
 
jurels-century-one-run-away
 
क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. मात्र, डावाच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालला खातेही उघडता आले नाही. त्याची विकेट गेल्यानंतर साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनी डावाची जबाबदारी स्वीकारली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सुदर्शनने ४१ धावांचे योगदान दिले.
 
यानंतर पडिक्कलने यश राठोडसोबत डाव पुढे नेला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ४० धावा जोडल्या. राठोड १३ धावा करून माघारी परतला. दुसरीकडे पडिक्कलने आपली चांगली लय कायम राखत १४० चेंडूंचा सामना केला आणि १२ चौकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी साकारली. मात्र, तो १३७ धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या. रविचंद्रनला खातेही उघडता आले नाही, तर वॉशिंग्टन सुंदर अवघ्या आठ धावा करून बाद झाला.
 
एका टप्प्यावर भारताची अवस्था १६० धावांत सहा गडी बाद अशी झाली होती. अशा कठीण परिस्थितीत कर्णधार ध्रुव जुरेलने संयम दाखवत डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने मानव सुथारसोबत सातव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. सुथारने २२ धावा केल्या. त्यानंतर जुरेलला आकाशदीपची साथ मिळाली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी ६९ धावांची अभेद्य भागीदारी करत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताला २९१ धावांपर्यंत पोहोचवले. आकाशदीप २५ धावांवर नाबाद आहे.
 
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जुरेलने १५५ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ९९ धावा केल्या होत्या. शतकापासून अवघ्या एका धावेवर असलेल्या जुरेलकडून दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. न्यूझीलंडकडून फ्रेझर शेठने प्रभावी गोलंदाजी करत चार बळी मिळवले. तर ब्रेट रँडेल, जॅरॉड मॅके आणि जेडन लेनॉक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. आता दुसऱ्या दिवशी जुरेलच्या शतकाकडे आणि भारतीय संघाच्या धावसंख्येकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.