नाशिक,
Kumbh Parva is sounded in Trimbakeshwar नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाला शनिवारी विधिवत सुरुवात झाली. गोदावरी नदीचे उगमस्थान आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र नगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले. दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर हा धार्मिक विधी पार पडला. शृंगेरी पीठाचे उत्तराधिकारी शंकराचार्य स्वामी विधुशेखर भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला दहा संन्यासी आखाड्यांचे श्रीमहंत, विविध आखाड्यांचे पदाधिकारी, साधू-संत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेदपठण, मंत्रोच्चार आणि शंखनादाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. संत-महंतांच्या सान्निध्यात पार पडलेल्या या ध्वजारोहणाने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक तयारीतील महत्त्वाच्या पर्वाला प्रारंभ झाला.

या सोहळ्यासाठी देशभरातील विविध आखाड्यांचे प्रमुख पदाधिकारी आणि संत त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले होते. जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री तसेच आखाडा परिषदेचे महामंत्री श्रीमहंत हरि गिरी, निरंजनी आखाड्याचे सचिव श्रीमहंत रवींद्र पुरी, आवाहन आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्रीमहंत सत्य गिरी, बडा उदासीन आखाड्याचे श्रीमहंत दुर्गादास, आनंद आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमहंत शंकरानंद सरस्वती, निर्मल आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमहंत देवेंद्रजी आणि नया उदासीन आखाड्याचे श्रीमहंत भगत रामजी यांच्यासह विविध आखाड्यांच्या प्रतिनिधींनी या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण यांच्या संयुक्त सौजन्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धर्मध्वजारोहणानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दुपारी सुमारे ३ वाजता कुशावर्त तीर्थावर पूजा-अर्चा करणार आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या दृष्टीने धर्मध्वजारोहणाला विशेष महत्त्व आहे. या सोहळ्यामुळे आगामी धार्मिक पर्वाच्या तयारीला औपचारिक सुरुवात झाली असून, पुढील काळात संत-महंत, आखाडे आणि नागा साधूंच्या सहभागाने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. २०२७ मध्ये संत-महंत आणि नागा साधूंचे अमृतस्नान होणार असून, ज्योतिषीय गणनेनुसार पहिले अमृतस्नान १२ ऑगस्ट २०२७ रोजी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये आतापासूनच कुंभमेळ्याच्या तयारीला वेग येण्याची अपेक्षा आहे. धर्मध्वजारोहणाच्या निमित्ताने झालेल्या धार्मिक विधींनी या आगामी पर्वाची उत्सुकता अधिक वाढवली आहे.