कारंजा लाड,
water-storage-available-in-adan-dam शहरासह परिसरातील गावाच्या पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार असलेल्या अडाण मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा आता निम्म्याच्या खाली घसरला आहे. ३० ऑटोबर रोजीच्या अधिकृत जलसाठा आकडेवारीनुसार धरणात केवळ ४९.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच धरणातील उपलब्ध साठ्यापैकी अंदाजे निम्मा भाग गाळाने व्यापलेला असल्याची माहिती समोर येत असल्याने प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध पाण्याचे प्रमाण किती, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसाळा संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच जलसाठ्याची ही परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी उन्हाळ्यात कारंजेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार का, अशी चिंता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.अडाण धरणाची पूर्ण संचय पातळी ३८२.५० मीटर आहे. मात्र, ३० ऑटोबर रोजी धरणातील पाणीपातळी ३७८.६६ मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. धरणात सध्या ३३.५३ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून, त्याची टक्केवारी ४९.८५ इतकी आहे. म्हणजेच धरणाच्या उपयुक्त जलसाठ्याने निम्म्याचा टप्पाही ओलांडलेला नाही. आजच्या दिवशी धरण परिसरात पावसाची नोंद शून्य असून, यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत एकूण ४५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अडाण धरणातील पाणीसाठ्याची आकडेवारी पाहता जलसाठा निम्म्याच्या खाली असल्याचे स्पष्ट होत असले, तरी यापेक्षाही चिंताजनक बाब म्हणजे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याची आहे. उपलब्ध साठ्यापैकी अंदाजे निम्मा भाग गाळाने व्यापलेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिणामी धरणाची प्रत्यक्ष साठवण क्षमता कमी होत असून, पावसाळ्यात जमा होणारे पाणी साठविण्याच्या क्षमतेवरही परिणाम होत आहे. गाळाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्यास भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शयता नाकारता येत नाही. कारंजा शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अडाण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी आणि उपलब्ध जलसाठ्याची मर्यादा पाहता प्रशासनासमोर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सध्याचा जलसाठा आणि गाळामुळे कमी झालेली प्रत्यक्ष साठवण क्षमता लक्षात घेता आगामी उन्हाळ्यात पाण्याचे संकट निर्माण होण्याची शयता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आतापासूनच काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे. धरणातील गाळाचा प्रश्न केवळ यंदाच्या पाणीसाठ्यापुरता मर्यादित नसून तो कारंजा शहराच्या भविष्यातील जलसुरक्षेशी संबंधित आहे. धरणाची मूळ साठवण क्षमता टिकवून ठेवण्यासाठी गाळ काढण्याचा प्रश्न गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित जलसंपदा विभागाने धरणातील गाळाचे शास्त्रीय सर्वेक्षण करून प्रत्यक्ष साठवण क्षमता किती शिल्लक आहे, याची माहिती सार्वजनिक करावी. तसेच गाळ काढण्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
अडाण धरणातील ४९.८५ टक्के जलसाठा, त्यात गाळामुळे कमी झालेली साठवण क्षमता आणि आगामी उन्हाळ्याचे आव्हान या तिन्ही बाबी गंभीर आहेत. शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, पाण्याची गळती रोखणे, अनावश्यक वापरावर नियंत्रण आणि पाणी बचतीबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शयता आहे.