मनसेची दिवाळी साधी; आतषबाजीला फाटा!

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
मुंबई,
MNS celebrates a simple Diwali महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाचा दीपोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त शिवाजी पार्क परिसरात करण्यात येणारी आकर्षक रोषणाई आणि आतषबाजी यंदा रद्द करण्यात आली आहे. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी या निर्णयाची माहिती दिली. पक्ष लहान असला तरी राज्यातील संकटाच्या काळात अनावश्यक खर्च टाळण्याची भूमिका आम्ही घेतली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदा शिवाजी पार्क येथे केवळ कंदील लावून दिवाळी साजरी केली जाणार आहे.
 
 
pawar
 
मनसेकडून दरवर्षी शिवाजी पार्क येथे रोषणाई आणि आतषबाजीसह दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या उत्सवाचे स्वरूप बदलण्यात आले आहे. दरम्यान, भाजप नेते अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेलाही यशवंत किल्लेदार यांनी प्रत्युत्तर दिले. एकाच मंचावर आशिष शेलार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना वातावरण खेळीमेळीचे होते. मग दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंवर टीका करण्याची गरज काय होती, असा सवाल त्यांनी केला. साटम यांनी राज ठाकरे यांच्याबाबत 'पाकिस्तानी एजंट' अशा स्वरूपाची टीका कोणत्या आधारावर केली, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आधी मुंबई भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि वादांकडे लक्ष द्यावे, असा टोलाही लगावला.
 
 
नाशिकमधील कुंभमेळ्याच्या आयोजनावरूनही किल्लेदार यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्र दुष्काळाचा सामना करत असताना कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपयांची कंत्राटे काढण्याची आवश्यकता काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यापूर्वीच कुंभमेळ्याच्या आयोजनात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. दुसरीकडे, गरीब शेतकऱ्यांना केवळ ५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले. मनसेचा कुंभमेळ्याला विरोध नसून त्यासाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खर्चाला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळा साधेपणानेही साजरा करता येऊ शकतो. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मनसेने रोषणाई आणि आतषबाजी रद्द केली, तर सत्ताधारी पक्षांनीही अशाच प्रकारे खर्चात कपात करण्याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.