पिंपरी-चिंचवड,
Mugdha found decomposed in flat गहुंजे येथील आलिशान गृहप्रकल्पातील एका बंद फ्लॅटमध्ये उच्चशिक्षित तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुग्धा अविनाश देशमुख (वय ३४, रा. छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणीचे नाव असून, ती छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवृत्त मुख्य अभियंत्याची मुलगी होती. मुग्धा जुलै २०२५ मध्ये एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली होती. तेथून ती नियमितपणे कुटुंबीयांशी संपर्कात होती. मात्र, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी आईशी झालेल्या शेवटच्या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. त्या वेळी तिने एका मुलाखतीसाठी जात असल्याचे आईला सांगितले होते. त्यानंतर संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी लंडनमधील तिच्या मैत्रिणींशी विचारणा केली. तेव्हा मुग्धाने ऑगस्ट २०२६ च्या अखेरीसच लंडन सोडल्याचे समोर आले. ती दोन महिन्यांपूर्वी भारतात परतली होती; मात्र, याची माहिती तिने कुटुंबीयांना दिली नव्हती. अखेर पालकांनी छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी मुग्धाचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला. तिच्या मोबाईलचे ठिकाण आणि बँक खात्यांमधील व्यवहारांची तपासणी करताना एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. तिचे क्रेडिट कार्ड झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिट या ऑनलाइन सेवांवर सातत्याने वापरले जात असल्याचे आढळले. त्यामुळे मुग्धा परदेशात नसून भारतातच असल्याचा अंदाज पोलिसांना आला. या व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी गहुंजे येथील लोढा बेलमोंडो गृहप्रकल्पातील एका बंद फ्लॅटचा शोध घेतला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता फ्लॅटचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर चावी बनवणाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. आत तपासणी केली असता बेडरूममध्ये मुग्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुग्धा ऑगस्ट महिन्यापासून या फ्लॅटमध्ये भाड्याने एकटीच राहत होती. ऑनलाइन वर्ग घेऊन ती स्वतःचा खर्च भागवत होती. विशेष म्हणजे, २१ ऑक्टोबर रोजी तिने घरकाम करणाऱ्या महिलेलाही कामावरून काढून टाकले होते. घटनास्थळी पोलिसांना काही औषधे आढळली असून, प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुग्धाने लंडनमधील शिक्षण सोडून भारतात परतण्याचा निर्णय का घेतला, कुटुंबीयांपासून भारतात आल्याची बाब का लपवली आणि तिच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, या प्रश्नांचा पोलीस तपास करत आहेत.