अनिल कांबळे
नागपूर
girl sexually assaulted एका १६ वर्षीय मुलीला चहा देण्यासाठी खोलीत बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सक्करदरा परिसरात उघडकीस आला आहे. अत्याचारानंतर कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आरोपीने दिल्याचा आरोप आहे. भीतीपोटी वर्षभर गप्प राहिलेल्या पीडित मुलीने शाळेत आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी ६० वर्षीय वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीचा नातेवाईक आहे. १ ऑक्टोबर २०२५ रोजी पीडित मुलगी श्रद्धानंदपेठ परिसरात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आई आणि अन्य एका नातेवाइकासोबत नातेवाईकाच्या घरी गेली होती. त्यावेळी एका महिलेने तिला पहिल्या मजल्यावरील खोलीत बसलेल्या आरोपीला चहा देण्यासाठी पाठविले. मुलगी खोलीत जाताच आरोपीने तिचा हात पकडून अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला असतानाही आरोपीने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडितेने मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, खोलीचा दरवाजा बंद असल्याने तिचा आवाज बाहेर पोहोचला नाही. आरोपीने तिचे तोंड दाबल्याचेही तक्रारीत नमूद आहे. कशीबशी आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर मुलगी खोलीबाहेर पडली. त्यावेळी आरोपीने तिचा हात पिरगळून घडलेला प्रकार कोणालाही सांगू नये, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. girl sexually assaulted तळमजल्यावर पोहोचल्यानंतर पीडित मुलगी बेशुद्ध पडली. मात्र, भीतीमुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर पीडित मुलीने आईसोबत सक्करदरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.