प्रेमाला विरोध केल्याने तरुणाची आत्महत्या

प्रेयसीच्या सहा नातेवाईकांवर गुन्हा

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर

Love Marriage चार वर्षांपासून जुळलेल्या प्रेमसंबंधानंतर लग्न करुन सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा विवाहाला झालेल्या विरोधातून बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीच्या नातेवाइकांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तब्बल साडेतीन महिन्यांनंतर प्रेयसीच्या सहा नातेवाईकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विशाल विलास जावडे (२१) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे एका २० वर्षीय तरुणीसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विशाल वेगळ्या संस्कृतीचा असल्याने तरुणीच्या कुटुंबीयांचा या विवाहाला विरोध होता.
 
Nagpur 21-Year-Old Dies by Suicide After Alleged Threats Over Love Marriage, Six Booked
 
तक्रारीनुसार, १२ जुलै २०२६ रोजी सहा आरोपी विशालच्या घरी पोहोचले. त्यांनी विशालच्या आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विशालने मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याला आणि त्याच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. आरोपींनी विशालला प्रेमसंबंध तोडण्याची धमकी दिली. ‘तुला ठार मारून आम्ही तुरुंगात जाऊ किंवा तुला आत्महत्या करण्यास भाग पाडू. मात्र, तुमचे लग्न होऊ देणार नाही,’ अशा शब्दांत धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकारामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या विशालने दुसऱ्याच दिवशी, १३ जुलै रोजी हिंगणा परिसरात विषारी पदार्थ प्राशन केला. त्याला तातडीने शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
 
आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
घटनेच्या चौकशीनंतर विशालच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी २९ ऑक्टोबर रोजी मनीषा (४४), मंगेश (३३), रोशन (३५), माधव (६०), गया (५८) आणि आकाश (२२) या सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ सह अन्य संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.