शेअर बाजाराच्या नावावर व्यावसायिकाला ११.५० लाखांचा गंडा

सायबर ठगांनी अनेक बँक खात्यांत वळविली रक्कम

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
share market शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी जरीपटका परिसरातील ६९ वर्षीय व्यावसायिकाला तब्बल ११ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला. सुरुवातीला गुंतवणुकीवर काही प्रमाणात नफा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

share market  
मनोहर रामदास केवलरामानी (६९, रा. धनलक्ष्मी सोसायटी, कुशीनगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तक्रारीनुसार, अनन्या कुलकर्णी आणि गुल टेकचंदानी या नावाच्या व्यक्तींनी केवलरामानी यांच्याशी व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधला. फिनसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीला गुंतवणुकीवर काही प्रमाणात परतावा मिळाल्याने केवलरामानी यांचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी अधिक गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे सांगून त्यांना जाळ्यात ओढले. आरोपींच्या सांगण्यावरून केवलरामानी यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमधील आपल्या खात्यातून विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ११ लाख ५० हजार रुपये जमा केले.
 
 
फसवणूक होताच तक्रार
गुंतवणुकीनंतर अपेक्षित share market  नफा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच केवलरामानी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी अनन्या कुलकर्णी आणि गुल टेकचंदानी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(३), ३४०(२), ६१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी) आणि ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीची रक्कम कोणत्या खात्यांमध्ये वळविण्यात आली आणि या टोळीत आणखी किती जण सहभागी आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत.