साहित्याच्या ‘विश्वातून’ घेतला जीवनाचा व्यापक वेध!

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-news वाचन माणसाला समृद्ध करते. जगाचा शोध घेतानाच स्वतःचा शोध घेण्याची, ‘कोऽहम्’ या मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याची जाणीवही करून देते. अशाच काही भारतीय आणि विदेशी साहित्यकृतींमधून जीवनाचे विविध पैलू, मानवी नातेसंबंध आणि व्यापक जीवनदृष्टीचा वेध घेणारा साहित्यिक पट रसिकांसमोर उलगडला. दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘व्यापक जीवनदृष्टी देणाऱ्या काही अन्यभाषी साहित्यकृती’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

nagpur-news
 
कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदिका अंजली दुरूगकर यांनी कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या साहित्यकृतींचा वाचकांच्या दृष्टिकोनातून परिचय करून दिला. ‘पर्व’ या कादंबरीतून उलगडणारे मानवी महाभारत, ‘वंशवृक्ष’मधून कुटुंबव्यवस्था, परंपरा, नातेसंबंध, विवाहसंस्था आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा घेतलेला वेध आणि ‘गृहभंग’ कादंबरीतून ग्रामीण स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या दुःखाचे प्रभावी चित्रण भैरप्पांनी कसे केले याचा आढावा त्यांनी घेतला. भैरप्पा आपल्या कादंबऱ्यांमधून जीवनाशी निगडित मूलभूत प्रश्न उपस्थित करतात, असे त्यांनी नमूद केले.
यानंतर माधवी भट यांनी ‘प्राचीन ते आजचे बंगाली साहित्य: व्हाया रवींद्रनाथ’ या विषयातून बंगाली साहित्याचा विस्तृत पट उलगडला. आठव्या दशकात बंगाली साहित्यात जीवनाची वचने सांगणारी ‘खणा’, सीतायण मांडणारी चंद्रावती, तसेच ‘विष्णुपुरी रामायण’, ‘जगतराम रामायण’ आणि ‘अद्भुत रामायण’ यांसारख्या साहित्यकृतींची त्यांनी ओळख करून दिली. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्यापासून तस्लिमा नसरीन, मल्लिका सेनगुप्ता आणि मंदाक्रांता सेन यांच्यापर्यंतच्या साहित्यिक व वैचारिक योगदानाचा त्यांनी आढावा घेतला. बंगाली साहित्याच्या प्रवासासोबतच तेथील सामाजिक चळवळींचाही धांडोळा त्यांनी घेतला. प्रसिद्ध लेखिका नेहा भांडारकर यांनी पाउलो कोयेल्हो यांच्या ‘द अल्केमिस्ट’ या कादंबरीचा वेध घेतला. स्वतःची स्वप्ने ओळखण्याची, त्यांचा पाठपुरावा करण्याची आणि आयुष्याचा खरा अर्थ शोधण्याची प्रेरणा देणारी ही कादंबरी माणसाला जगण्याची दिशा देणारे तत्त्वज्ञान मांडते, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्रसिद्ध लेखक व समीक्षक संजय आर्वीकर यांनी साहित्याचा विचार सर्व साहित्यप्रवाहांच्या व्यापक संदर्भातून समजून घेण्याची गरज व्यक्त केली. प्रास्ताविक अभिव्यक्तीच्या अध्यक्ष स्वाती सुरंगळीकर यांनी केले. संचालन नीता खोत यांनी केले.