ब्राझीलिया,
News about Senator Flavio Bolsonaro ब्राझीलच्या राजकारणात निवडणुकीनंतर नवा वाद निर्माण झाला आहे. सिनेटर फ्लेवियो बोल्सोनारो यांनी स्वतःला देशाचे 'खरे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष' घोषित करत विद्यमान राष्ट्राध्यक्ष लुइज इनासियो लूला दा सिल्वा यांच्या फेरनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्यांनी आता अमेरिकेतूनच ब्राझीलमधील विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याची घोषणा केली आहे. फ्लेवियो आपल्या कुटुंबासह ब्राझील सोडून अमेरिकेत दाखल झाले आहेत. बुधवारी ब्राझीलमधील नागरिक आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी देशातून पळ काढल्याचा आरोप फेटाळला. राजकीय छळ आणि देशातील वाढत्या हुकूमशाही प्रवृत्तीपासून स्वतःला वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेत आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेले कायदेशीर संरक्षण मिळू शकते, जे सध्या ब्राझीलमध्ये उपलब्ध नसल्याचा दावाही त्यांनी केला. ''मी ब्राझीलमधून पळून आलेलो नाही, तर देशाच्या हितासाठीच ब्राझील सोडले आहे,'' असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. देशात राहिलो असतो तर राजकीय नेतृत्व करणे शक्य झाले नसते, असेही त्यांनी नमूद केले.

फ्लेवियो यांनी २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीदरम्यान लूला यांना एक कोटींपेक्षा अधिक मते मिळणे अशक्य असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला. काही मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ वाढवण्याच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. न्यायालयीन अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा अतिरेक केल्याचा आरोप करत निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या कथित उल्लंघनांच्या आधारे लूला-अल्कमिन यांच्या उमेदवारीला अपात्र ठरवायला हवे होते, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा त्यांनी आपल्या निवेदनात सादर केलेला नाही. विशेष म्हणजे, फ्लेवियो यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणाऱ्या ब्राझीलच्या लिबरल पार्टीने (PL) यापूर्वीच अधिकृत निवडणूक निकाल स्वीकारला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर राजकीय आणि लोकशाही प्रक्रियेतून तोडगा काढण्याची भूमिका पक्षाने घेतली होती.
दरम्यान, फ्लेवियो यांनी ब्राझीलच्या सर्वोच्च फेडरल न्यायालयावरही गंभीर आरोप केले आहेत. स्वतःसह त्यांचे वडील आणि ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांच्याविरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यात आपला पासपोर्ट जप्त करणे, इलेक्ट्रॉनिक देखरेख ठेवणे, अभिव्यक्तीवर निर्बंध आणणे, नजरकैदेत ठेवणे आणि अखेरीस राजकीय हेतूने दोषी ठरवणे अशा कारवाया होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र, आपल्याविरोधात कोणतेही अटक वॉरंट जारी झालेले नसल्याचे सांगत त्यांनी कोणताही गुन्हा केल्याचा आरोपही नाकारला. अमेरिकेतूनच विरोधकांचे नेतृत्व करण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी आपल्या सहकारी खासदारांना आणि राज्यांच्या गव्हर्नरांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ब्राझीलमध्ये मोकळेपणाने भूमिका मांडता येत नसलेल्या समर्थकांचा आवाज आपण अमेरिकेतून उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सिनेटच्या अध्यक्षपदासाठी सिनेटर रोजेरियो मारिन्हो यांचे नावही त्यांनी पुढे केले आहे. त्यामुळे फ्लेवियो यांच्या अमेरिकेतील वास्तव्यानंतर ब्राझीलच्या राजकारणात विरोधकांची पुढील रणनीती काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.