शिक्षकांना परीक्षा कामातील मानधन की भिक्षा

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
पुलगाव,
pulgaon अनेक वर्षापासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षामध्ये अल्पसे मानधन देऊन शिक्षकाच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. ३ तासाच्या पेपरला पर्यवेक्षकाला ३० रुपये मानधन दिले जाते. ३ तासाला ३० रुपये म्हणजे तासाला १० रुपये. जिकरीचे काम करताना मानधन की शिक्षकांना भिक्षा असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
 
 
pulgaon
 
शिक्षकांना तीन तासात विद्यार्थी कुठल्याही गैर प्रकारचा अवलंब करणार नाही याची दक्षता घ्यावी लागते आणि नजर चुकीने एखादा विद्यार्थी गैर मार्गाचा अवलंब करताना दिसला तर पर्यवेक्षक शिक्षकाला जबाबदार पकडून त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही केली जाते. शिक्षकांवर विश्वासचं नसेल तर या कामासाठी त्यांची निवड का केली जाते? एवढेच नव्हे तर केंद्र संचालक, अतिरिक्त केंद्र संचालक याच्यावर संपूर्ण परीक्षेची जबाबदारी टाकून त्यांनी अल्प मानधनावर कामं पार पाडावी अशी फाजिल अपेक्षा ठेवली जाते. परीक्षा काळात इतर कार्यालयीन यंत्रणा सुद्धा अत्यल्प मानधनावर कार्य करीत असतात. परीक्षा आटोपल्यानंतर लगेच सर्व विषयाचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षक, नियामक, मुख्य नियामक अशा जबाबदारी देऊन कामे दिली जातात. मात्र, पुन्हा एकदा अल्प मानधन देऊन शिक्षकाची आर्थिक पिळवणूक केली जाते. ३ तासाच्या पेपरसाठी केवळ ३० रुपये एवढेच मानधन दिले जाते. त्यातही पेपर लवकरात लवकर तपासून जमा करण्याची मुदत देण्यात येते. शिक्षक आपल्या वाट्याला आलेली कामे अतिशय प्रामाणिकपणे पाडतो.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी या सर्व बाबीवर सखोल विचार करावा आणि परीक्षा कामातील सर्व कामाचे मानधन वाढ करून द्यावी. जर मानधन वाढ करणे शक्य नसेल तर परीक्षा मंडळाने हे काम शैक्षणिक काम असून ते शिक्षकांनी कुठलाही मोबदला न घेता पूर्ण करावे असे आदेश काढावे. आम्ही शिक्षक तेही स्वखुषीने विद्यार्थी हित लक्षात घेऊन पूर्णत्वास नेऊ असा विश्वासही शिक्षकांतर्फे महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अमित चिनेवार यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.