बारा घंटा, मगर अन् 'ह्रीं'; सिंहस्थ धर्मध्वजातील प्रत्येक चिन्ह

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
नाशिक,
Symbol on the religious flag of the Simhastha बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभपर्वाचा प्रारंभ झाला आहे. या पर्वाच्या औचित्याने ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर पंचवटीतील रामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजाचे आरोहण करण्यात आले. त्याच वेळी त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. या सिंहस्थ पर्वासाठी उभारण्यात आलेला धर्मध्वज केवळ धार्मिक परंपरेचे प्रतीक नसून त्यामध्ये पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र आणि गोदावरीच्या तीर्थपरंपरेचा अर्थ सामावलेला आहे. ध्वजावरील प्रत्येक चिन्हामागे विशिष्ट संकल्पना असून, त्यातून सिंहस्थ पर्वाचे महत्त्व अधोरेखित होते.
 
  

Symbol on the religious flag of the Simhastha
 
धर्मध्वजावरील सूर्य, चंद्र आणि बृहस्पती ही चिन्हे अमृत कुंभाच्या रक्षणाशी संबंधित पौराणिक परंपरेची आठवण करून देतात. बृहस्पतीचा सिंह राशीतील प्रवेश हा सिंहस्थ पर्वाच्या कालगणनेचा प्रमुख आधार मानला जातो. त्यामुळे बृहस्पती आणि सिंह यांचे चित्रण या ध्वजावर विशेष महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर ध्वजावर असलेल्या बारा घंटा या बारा राशी आणि बृहस्पतीच्या भ्रमणचक्राचे प्रतीक आहेत. गोदावरी नदीशी संबंधित मगर हे तिच्या वाहनाचे प्रतीक म्हणून दर्शवण्यात आले आहे. ॐकार आणि स्वस्तिक या शुभचिन्हांनाही धर्मध्वजात स्थान देण्यात आले आहे.
 
धर्मध्वजावरील दशदिशांचे चित्रणही विशेष अर्थपूर्ण आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ऊर्ध्व आणि अवाच्य अशा दहा दिशांमधून सिंहस्थ पर्वाची व्यापकता दर्शवण्यात आली आहे. याशिवाय 'ह्रीं' हे अक्षर वैश्विक चेतना, माया आणि सृजनशक्तीचे ध्वनीरूप प्रतीक मानले जाते. अशा प्रकारे सूर्य, चंद्र, बृहस्पती, सिंह, बारा घंटा, मगर, ॐकार, स्वस्तिक, दशदिशा आणि 'ह्रीं' या प्रतीकांच्या माध्यमातून धर्मध्वजात अमृत कुंभाची पौराणिक परंपरा, ज्योतिषीय कालचक्र आणि गोदावरीचे धार्मिक महत्त्व एकत्रितपणे मांडण्यात आले आहे.