रक्षकांना ओलीस ठेवलं अन् तुरुंग फोडून १७ 'कैदी फरार'

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
तमिळनाडू
Tamil Nadu Jail Escape तमिळनाडूमधील थेनी जिल्ह्यातील थेक्कम्पट्टी उप-तुरुंगात सुरक्षाव्यवस्थेला हादरा देणारी घटना घडली आहे. आजारी असल्याचे नाटक करून तुरुंग रक्षकांची दिशाभूल करणाऱ्या १७ न्यायप्रविष्ट कैद्यांनी अचानक रक्षकांना ओलीस ठेवत तुरुंगातून पलायन केले. २६ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेत कैद्यांनी रक्षकांकडील तुरुंगाच्या चाव्या जबरदस्तीने ताब्यात घेतल्या आणि कारागृहातून पळ काढला. या प्रकारामुळे तुरुंग प्रशासनात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने व्यापक शोधमोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान पळून गेलेल्या सर्व १७ कैद्यांना पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले.
 

Tamil Nadu Jail Escape 17 Undertrial Prisoners Recaptured, 9 Staff Suspended 
या गंभीर घटनेची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली असून मुख्यमंत्री विजय यांनी प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तुरुंगातील सुरक्षेत झालेली चूक आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार, थेनी तुरुंगाचे अधीक्षक नागेश्वरन यांना ३० ऑक्टोबरपासून पुढील आदेश मिळेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय, मदुराई मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक आर. कृष्णराज यांची बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे सालेम मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत कर्तव्यात कसूर केल्याचे आढळलेल्या अन्य नऊ तुरुंग कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
थेनी उप-तुरुंगातील प्रकारानंतर संपूर्ण तमिळनाडूमधील कारागृहांच्या सुरक्षा व्यवस्थेचा उच्चस्तरीय आढावा घेण्यात आला आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी राज्यातील सर्व तुरुंगांमधील सुरक्षा अधिक कडक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. कारागृहांमध्ये चोवीस तास देखरेख ठेवण्याबरोबरच कैद्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. सुरक्षेच्या जबाबदारीत कोणत्याही प्रकारची कसूर किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
दरम्यान, या घटनेच्या Tamil Nadu Jail Escape पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहांच्या पायाभूत सुविधा आणि अंतर्गत कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी विशेष उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि प्रशासकीय कामकाजातील त्रुटी दूर करणे यावर सरकारचा भर आहे. तुरुंगांमधील देखरेख व्यवस्था अधिक प्रभावी करून कैद्यांकडून अशा प्रकारच्या पलायनाच्या घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक बदल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. थेनीतील घटनेने कारागृहांच्या सुरक्षेतील त्रुटी समोर आणल्या असून, त्यानंतर संपूर्ण राज्यातील तुरुंग प्रशासन सतर्क झाले आहे.