वर्धा,
districts-average-paisewari जिल्ह्यातील १ हजार ३४० गावांची यंदाच्या खरीप हंगामातील पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी ३० ऑक्टोबरला जाहीर केली. या सुधारित पैसेवारीनुसार जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५२ पैसे निश्चित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील २७० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने खरीप हंगामातील पीक परिस्थितीबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ५० पैशांच्या आत पैसेवारी असलेल्या गावांमध्ये देवळी तालुक्यातील १५० आणि कारंजा तालुक्यातील १२० गावांचा समावेश आहे. तालुकानिहाय पैसेवारीचा विचार करता वर्धा तालुक्याची ५२ पैसे, सेलूची ५३ पैसे, देवळी ५० पैसे, आर्वी ५३ पैसे, आष्टी ५२ पैसे, कारंजा ५० पैसे, हिंगणघाट ५५ पैसे, तर समुद्रपूर तालुक्याची ५४ पैसे पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. हिंगणघाट तालुक्याची पैसेवारी सर्वाधिक तर देवळी आणि कारंजा तालुक्यांची पैसेवारी सर्वात कमी आहे.
कुठल्या तालुक्यात किती पेरणी?
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पेरणी आणि लागवड करण्यात आली होती. वर्धा तालुक्यात ५९ हजार २११ हेक्टर लागवड क्षेत्रापैकी ५८ हजार ४७० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड झाली. सेलू तालुक्यात ४९ हजार २८२ हेक्टरपैकी ४३ हजार ८०८ हेक्टर, देवळी ५५ हजार ३४ हेक्टरपैकी ५१ हजार ६५८ हेक्टर, आर्वी ५२ हजार ८३२ हेक्टरपैकी ३५ हजार १३३ हेक्टर, आष्टी २५ हजार ३७६ हेक्टरपैकी २३ हजार ७९१ हेक्टर, तर कारंजा तालुक्यात ४४ हजार ३८ हेक्टरपैकी ३० हजार ९५५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड झाली होती. त्याचप्रमाणे हिंगणघाट तालुक्यात ७९ हजार २८४ हेक्टरपैकी ७४ हजार ८५० हेक्टर, तर समुद्रपूर तालुक्यात ६४ हजार ६१० हेक्टरपैकी ६४ हजार १२९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. मोठ्या क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होऊनही जिल्ह्यातील २७० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.