माणकेश्वरच्या महासरस्वती शिल्पाशी दहेगावच्या मूर्तीचे साधर्म्य!

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
पराग मगर
 
नागपूर,
mahasaraswati-sculpture-at-mankeshwar धाराशिव जिल्ह्यातील माणकेश्वर येथे अलीकडेच उजेडात आलेल्या महासरस्वती देवीच्या मूर्तीशी साधर्म्य असलेले आणखी एक प्राचीन शिल्प वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथे आढळले आहे. नागपूर येथील इतिहास अभ्यासक डॉ. सुधीर लिंगे यांनी या शिल्पाचा अभ्यास केला असून, हे शिल्प महासरस्वती देवीचे असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
 
mahasaraswati-sculpture-at-mankeshwar
 
मूर्तीची रचना, आयुधे आणि शिल्पशैली लक्षात घेता ती इसवी सनाच्या १२व्या ते १३व्या शतकातील यादवकालीन असावी, असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. माणकेश्वर आणि दहेगाव येथील या दोन शिल्पांमधील साम्यामुळे मध्ययुगीन शिल्पपरंपरेच्या अभ्यासासाठी नवा संदर्भ उपलब्ध झाला आहे. दहेगाव (गोसावी) येथील तुळजापूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर एका झाडाखाली हे शिल्प ठेवण्यात आले आहे. गावातील नागरिक या मूर्तीची संतोषी माता, मातादेवी किंवा शितलामाता म्हणून पूजा करतात. मात्र, मूर्तीच्या स्वरूपाचा आणि त्यावरील शिल्पलक्षणांचा अभ्यास केल्यानंतर ती महासरस्वती देवीची असल्याचे डॉ. लिंगे यांच्या लक्षात आले.
 
शिल्पाची वैशिष्ट्ये
सुमारे दोन फूट उंच आणि सव्वा फूट रुंदीची ही मूर्ती काळसर बेसॉल्ट म्हणजेच दख्खनच्या ज्वालामुखीय पाषाणात कोरलेली आहे. चतुर्भुज स्वरूपातील देवी ललितासनात विराजमान असून, एक पाय खाली सोडलेला तर दुसरा दुमडलेला आहे. डाव्या वरच्या हातात वीणा, डाव्या खालच्या हातात वेदपुस्तिका, उजव्या खालच्या हातात जपमाळ किंवा अक्षमाळ दिसते. डावा खालचा हात वरदमुद्रेत, तर उजवा खालचा हात अभयमुद्रेत आहे. उजवा वरचा हात तुटलेला असल्याने त्यातील मूळ आयुधाची ओळख पटत नाही. ते अंकुश किंवा पुष्पासारखे असावे, असा अंदाज आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीखाली हंससदृश पक्षीही स्पष्टपणे दिसतो. मूर्तीचा चेहरा काळाच्या ओघात काहीसा झिजला असला तरी त्यावरील शांत आणि प्रमाणबद्ध भाव लक्ष वेधून घेतात. डोक्यावर उंच करंडमुकुट, छातीवर अलंकार आणि हारांची रचना तसेच हातापायांवरील दागिन्यांचे कोरीवकाम दिसून येते. मागील बाजूस असलेली दगडी पट्टी प्रभावळीसारखी आहे. मूर्तीची संपूर्ण रचना एकाच पाषाणखंडातून साकारण्यात आली असून, तिच्या प्रमाणबद्धतेतून शिल्पकाराचे कौशल्य दिसून येते.
 
दोन्ही सरस्वतींमध्ये रचनात्मक साम्य
धाराशिव जिल्ह्यातील माणकेश्वर येथे अलीकडे प्रकाशात आलेली महासरस्वतीची मूर्ती आणि दहेगाव येथील शिल्प यांच्यात अनेक बाबतींत साम्य आढळते. दोन्ही मूर्तींचे देवतास्वरूप, शिल्परचना आणि आयुधांची मांडणी यांतील साम्य विशेष लक्षवेधी आहे. मात्र, माणकेश्वर येथील मूर्तीच्या तुलनेत दहेगाव येथील शिल्पावरील कोरीव काम तुलनेने कमी नक्षीदार आहे. तरीही एकाच पाषाणखंडातून घडविलेली मूर्ती, तिच्यामागील प्रभावळ आणि शिल्पातील प्रमाणबद्धता यांमुळे तिचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते. या दोन्ही शिल्पांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास मध्ययुगीन काळातील महासरस्वतीच्या मूर्तिनिर्मितीची शैली आणि प्रादेशिक शिल्पपरंपरेविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.
या शोधामुळे दहेगाव (गोसावी) गावाला महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नकाशावर नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झाडाखाली असलेल्या या शिल्पाचे योग्य जतन आणि संरक्षण होणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाने या दुर्मिळ शिल्पाची दखल घेऊन त्याच्या संवर्धनासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, यासंदर्भातील प्राथमिक माहिती वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली आहे.
डॉ. सुधीर लिंगे
इतिहास अभ्यासक