गोंदिया
accident gondia मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील देवरी तालुक्यातील धोबीसराड गावाजवळ शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास एका ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात ट्रॅव्हल्सचा चालक गंभीर जखमी झाला असून, बसमधील ३६ प्रवासी दैवबलाने सुखरूप बचावले आहेत. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठी जीवितहानी टळली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, ट्रॅव्हल्स क्रमांक सीजी ०४ क्यू झेड ३१५५ ही पुण्याहून रायपूरकडे प्रवासी घेऊन जात होती. धोबीसराड परिसरात पहाटेच्या सुमारास ओव्हरटेक करताना एका ट्रकचा धक्का ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाला लागला, त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मात्र, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करत चालकाने ट्रॅव्हल्स थेट डिव्हायडरच्या दिशेने वळवली. या भीषण अपघातात चालक गंभीर जखमी झाला, परंतु सुदैवाने बसमधील सर्व ३६ प्रवासी सुरक्षित राहिले. अपघाताची माहिती मिळताच नरेंद्रचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी चालकाला तात्काळ देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी देवरी पोलिस पुढील तपास करत आहेत.