नवी दिल्ली,
vaibhav-suryavanshi भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आपल्या फलंदाजीसोबतच गोलंदाजी कौशल्य विकसित करण्यासाठीही मेहनत घेत आहे. भारतीय संघात आपले स्थान अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने तो नियमितपणे गोलंदाजीचा सराव करत असल्याचा खुलासा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी केला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले जाण्याची चर्चा सुरू होती. संघातील खेळाडूंमध्ये असलेल्या स्पर्धेमुळे त्याला प्रत्येक सामन्यात संधी मिळत नव्हती. मात्र, ईशान किशन दुखापतग्रस्त झाल्यानंतर वैभवला दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. वेलिंग्टन येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात त्याने अभिषेक शर्मासोबत आक्रमक फलंदाजी करत अवघ्या सहा षटकांत १०० हून अधिक धावांची भागीदारी केली. या प्रभावी कामगिरीनंतरही पुढील सामन्यात त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. दरम्यान, वैभवच्या भविष्यातील तयारीबाबत प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी महत्त्वाची माहिती दिली. वैभव सध्या गोलंदाजी सुधारण्यावर विशेष लक्ष देत असून त्यासाठी नियमित सराव करत आहे. या कौशल्याबाबत तो गंभीर असल्याचेही बहुतुले यांनी स्पष्ट केले.
याबाबत बोलताना बहुतुले म्हणाले की, वैभवला गोलंदाजीमध्ये आणखी वेळ द्यावा लागणार आहे. तो गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक असून सातत्याने सराव करत आहे. संघ व्यवस्थापनाकडून त्याला आवश्यक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, संघात काही अनुभवी खेळाडू असल्याने त्यांनाही संधी द्यावी लागते. टी-२० क्रिकेटमध्ये वैभव एक-दोन षटके गोलंदाजी करू शकला, तर त्याचा संघाला फायदा होईल. त्यासाठी तो पडद्यामागे मेहनत घेत असून गोलंदाजीच्या बाबतीत पूर्णपणे गंभीर आहे, असे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत सात गडी गमावून २५९ धावांचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला नऊ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १७२ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना ८७ धावांनी जिंकला.