झुंजीत एका वाघाचा मृत्यू

ब्रम्हपुरी वनक्षेत्रात वाघांमधील अंतर्गत संघर्ष तीव्र

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
हल्लेखोर वाघाची ओळख पटविण्यासाठी परिसरात ‘कॅमेरा ट्रॅप’


ब्रह्मपुरी,
a-tiger-dies-in-a-clash वाघांच्या वाढत्या संख्येमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रात प्रादेशिक वर्चस्वाची लढाई कमालीची तीव्र झाली आहे. उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात दोन वाघांच्या अशाच हिंसक झुंजीत दीड ते दोन वर्ष वयाच्या एका तरुण नर वाघाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. दरम्यान, हल्लेखोर वाघाची ओळख पटवण्यासाठी वनविभागाने परिसरात ‘कॅमेरे’ लावले आहेत.
 
 
a-tiger-dies-in-a-clash
 
एका बलाढ्य वाघाने तरूण वाघाचा थेट जंगलातून शेतापर्यंत पाठलाग करीत ठार मारले आणि त्यानंतर अर्धवट खाल्ल्याचे वनविभागाच्या तपासात समोर आले आहे. उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील बरडकिन्ही येथील शेतकरी पटवारी गेडाम हे शेतात गेले असता, त्यांना वाघाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली. उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. घटनास्थळावरील रक्ताचे डाग आणि फरफटत नेल्याच्या खुणांवरून, बलाढ्य वाघाने जंगलातून पाठलाग करीत या तरुण वाघाला शेतात गाठून ठार केल्याचा अंदाज वनाधिकार्‍यांनी वर्तवला आहे. मृत वाघाचे ब्रह्मपुरी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, कायदेशीर प्रक्रिया म्हणून वाघाचा ‘विसरा’ पुढील न्यायवैद्यक चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.
 
 
दरम्यान, हल्लेखोर वाघाची ओळख पटवण्यासाठी वनविभागाने परिसरात ‘कॅमेरा ट्रॅप’ लावले आहेत. ब्रह्मपुरीत वाघांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने स्वतःचे क्षेत्र तयार करण्यासाठी तरुण वाघांना जुन्या वाघांशी संघर्ष करावा लागत असल्याचे वन्यजीव तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाने ग्रामस्थांना शेतात जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.