दुबई विमान हल्ल्याचे अल-कायदाकडून कौतुक

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
दुबई,
Al-Qaeda praises Dubai plane attack दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या FZ1073 विमानातील कथित हल्ल्याच्या घटनेचे अल-कायदाकडून गौरव करण्यात आल्याचा दावा समोर आला आहे. वृत्तानुसार, अल-कायदाने या घटनेची तुलना 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत झालेल्या 9/11 दहशतवादी हल्ल्याशी केली आहे. अमेरिकन आणि इस्रायली नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी अशाच प्रकारच्या हल्ल्यांना प्रोत्साहन देण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.अल-कायदाच्या प्रेरणेने जुलैमध्ये सुरू झालेल्या ‘अल-बयान’ या साप्ताहिक प्रकाशनाच्या ताज्या अंकात हा मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रकाशनाच्या अधिकृत प्रसिद्धीपूर्वी हा मजकूर अल-कायदाशी संबंधित टेलिग्राम चॅनेलवर प्रसारित करण्यात आल्याचा दावा ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने केला आहे. लेखामध्ये 9/11 हल्ल्याचा तसेच 30 सप्टेंबर रोजी फ्लाय दुबईच्या FZ1073 विमानात घडलेल्या कथित हल्ल्याचा संदर्भ देण्यात आला आहे.
 
 

s35657
 
FZ1073 हे विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने रवाना झाले होते. विमानात 174 जण होते. प्रवासादरम्यान अल-हम्मामी याने कथितपणे कॅप्टन स्मित मचार यांच्यावर कॉकपिटमध्ये हल्ला केला. या घटनेनंतर विमानाची उंची झपाट्याने कमी होऊ लागली. सुमारे 34,000 फूट उंचीवर असलेले विमान 17,000 फुटांपेक्षाही खाली आले होते.हल्ल्यादरम्यान कॅप्टन स्मित मचार कॉकपिटमध्ये कोसळले होते. विमानाची उंची कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, को-पायलटने त्यांना कॉकपिटच्या दरवाजापासून रोखल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर कॉकपिटमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून विमानातील दोन राखीव पायलट पुढे आले आणि त्यांनी विमानाचा ताबा घेतला.
 
 
या प्रयत्नांमुळे विमानाचे नियंत्रण पुन्हा मिळवण्यात यश आले. त्यानंतर विमान सौदी अरेबियातील तबूक येथील प्रिन्स सुल्तान बिन अब्दुलअजीज विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमान उतरल्यानंतर अल-हम्मामी याला ताब्यात घेण्यात आले.दरम्यान, अल-कायदाच्या या प्रकाशनात 11 सप्टेंबरच्या हल्ल्यावेळी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान आदळतानाचा फोटो आणि दुबईच्या FZ1073 विमानातील कथित हल्ल्याशी संबंधित छायाचित्र वापरण्यात आल्याचेही ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या अहवालात म्हटले आहे. लेखातून अमेरिका आणि इस्रायलविरोधात हिंसक कारवायांना प्रोत्साहन देणारी भाषा वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.