मुंबई
vande bharat express बंगळुरु ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतीक्षित बंगळुरु-मुंबई स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या गाडीच्या संचालनासाठी रेल्वे बोर्डाने दोन स्लीपर रेक मंजूर केले असून, आठवड्यातून सहा दिवस ही सेवा चालवण्याचा प्रस्ताव आहे. उद्घाटन फेरीनंतर लवकरच नियमित सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, प्रस्तावित मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. रेल्वे बोर्डाने सुचविलेल्या मार्गात पुणे-मिरज-हुबळी या महत्त्वाच्या रेल्वे मार्गाला वगळून सोलापूरमार्गे गाडी चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील अनेक महत्त्वाच्या शहरांना नव्या स्लीपर वंदे भारतची थेट कनेक्टिव्हिटी मिळणार नाही.
रेल्वे बोर्डाच्या vande bharat express पत्रानुसार प्रस्तावित गाडी बंगळुरु, धर्मावरम, वाडी, कलबुर्गी, रायचूर, गुंतकल, अनंतपूर, सोलापूर, पुणे, कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांवरून धावणार आहे. या मार्गामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड आणि मिरज यांसह कर्नाटकातील बेळगावी, हुबळी, धारवाड आणि दावणगेरे या महत्त्वाच्या शहरांना थेट रेल्वे जोडणी मिळणार नाही.पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील ही शहरे औद्योगिक, व्यापारी तसेच शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी या शहरांमधून बंगळुरु, पुणे आणि मुंबईकडे प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित मार्गाचा फेरविचार करून पुणे-सातारा-सांगली-मिरज-बेळगावी-हुबळी या मार्गाचा समावेश करावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे. सांगली, कोल्हापूर आणि बेळगावातील प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे याबाबत जोरदार पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे स्लीपर वंदे भारतचा अंतिम मार्ग कोणता निश्चित होतो, याकडे या भागातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.