प्रणव सातोकर
नागपूर
champa-steel-utensil-bank लग्नसमारंभ असो, धार्मिक कार्यक्रम असो किंवा गावातील एखादा सार्वजनिक सोहळा... कार्यक्रम संपल्यानंतर रस्त्याच्या कडेला, मैदानात किंवा नाल्याजवळ पडलेल्या प्लास्टिकच्या प्लेट्स, ग्लास, वाट्या आणि थर्मोकोलच्या पत्रावळी ग्रामीण भागातील नेहमीचे चित्र बनले आहे. काही तासांच्या कार्यक्रमानंतर निर्माण होणारा हा कचरा मात्र पर्यावरणासाठी दीर्घकाळाची समस्या ठरतो. या समस्येला केवळ उपदेशाने नव्हे, तर पर्याय उपलब्ध करून उत्तर देण्याचा प्रयोग उमरेड तालुक्यातील चांपा ग्रामपंचायतीने केला आहे.
गावात ‘स्टील भांडी बँक’ सुरू करून कार्यक्रमांमधील डिस्पोजेबल वस्तूंच्या वापराला आळा घालण्यात आला. फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाला सात महिने पूर्ण झाले असून, ग्रामपंचायतीच्या माहितीनुसार गाव सुमारे ९० टक्के डिस्पोजलमुक्त झाले आहे. विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धनासोबतच या उपक्रमातून ११ महिलांना रोजगार मिळाला असून त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
जनावराच्या मृत्यूने दिला धक्का
चांपा गावात प्लास्टिक आणि डिस्पोजेबल वस्तूंचा वाढता वापर ग्रामपंचायतीच्या लक्षात येत होता. मात्र, एका जनावराच्या मृत्यूनंतर त्याच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि डिस्पोजेबल कचरा आढळला आणि समस्येचे गांभीर्य अधिक स्पष्ट झाले.
गावातील कार्यक्रमांमधून निर्माण होणारा कचरा जनावरांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकतो, हे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीने डिस्पोजेबल वस्तूंचा वापर कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ‘डिस्पोजेबल बंद’ म्हटले की त्याला पर्याय काय, हा प्रश्न समोर होता.
एका प्रश्नातून उभी राहिली ‘भांडी बँक’
कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात स्टीलची भांडी आणायची कुठून, त्यांची देखभाल कोण करणार आणि कार्यक्रमानंतर ती स्वच्छ करून पुन्हा उपलब्ध कोण करून देणार, या प्रश्नांवर उपाय म्हणून चांपा (गट) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अतिष पवार यांनी ‘स्टील भांडी बँके’ची संकल्पना मांडली.
ग्रामपंचायतीने ती प्रत्यक्षात आणत बिरसा महिला बचत गट आणि सावित्रीबाई फुले महिला बचत गट यांच्याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविली.
आता गावात कार्यक्रम असल्यास नागरिकांना नाममात्र शुल्कात स्टीलची भांडी उपलब्ध होतात. कार्यक्रमानंतर भांडी परत घेतली जातात, त्यांची स्वच्छता केली जाते आणि पुढील वापरासाठी ती सज्ज ठेवली जातात. त्यामुळे ‘वापरा आणि फेका’ या पद्धतीऐवजी ‘वापरा, स्वच्छ करा आणि पुन्हा वापरा’ ही पद्धत गावात रुजली आहे.
भांडी बँकेत सध्या सुमारे १ हजार ताटे, १ हजार ५०० वाट्या आणि १ हजार ग्लास, यासह कार्यक्रमासाठी लागणारी इतर स्टीलची भांडी उपलब्ध आहेत.
या भांड्यांचे वाटप, परतावा, स्वच्छता आणि देखभाल महिला बचत गटाच्या माध्यमातून केली जाते. गावातील कार्यक्रमांमध्ये महिलांचा थेट सहभाग असल्याने पर्यावरणाचा हा उपक्रम आता त्यांच्या रोजगाराशीही जोडला गेला आहे.
या प्रक्रियेतून ११ महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे. त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याने भांडी बँक ही केवळ प्लास्टिकमुक्तीची योजना न राहता महिला आर्थिक सक्षमीकरणाचे माध्यम बनली आहे.
सात महिन्यांत ९० टक्के डिस्पोजलमुक्त
फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरू झालेल्या या प्रयोगाचा सात महिन्यांत लक्षणीय परिणाम दिसून आला आहे. ग्रामपंचायतीच्या माहितीनुसार, गावातील कार्यक्रमांमध्ये डिस्पोजेबल प्लेट्स, थर्मोकोलच्या पत्रावळी, प्लास्टिकच्या वाट्या आणि ग्लास यांचा वापर जवळपास बंद झाला असून गाव सुमारे ९० टक्के डिस्पोजलमुक्त झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना केवळ डिस्पोजेबल वापरू नका, असे सांगितले गेले नाही; त्याऐवजी त्याच कामासाठी स्टीलची भांडी गावातच उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणे सहज शक्य झाले.
चांप्याची दखल थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून
ग्रामपंचायतीच्या या अभिनव प्रयोगाची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवरूनही घेण्यात आली असून, चांप्याच्या स्टील भांडी बँकेची स्टोरी तेथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गावपातळीवरील एका उपक्रमाची राज्याच्या पातळीवर दखल घेतली जाणे, ही या प्रयोगाची वेगळीच जमेची बाजू ठरली आहे. स्थानिक समस्या आणि स्थानिक साधनांचा वापर करून पर्यावरणपूरक बदल घडवता येतो, याचे चांपा हे उदाहरण ठरत आहे.
चांप्याचा प्रयोग केवळ भांडी बँकेपुरता मर्यादित ठेवण्याचा ग्रामपंचायतीचा मानस नाही. राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून गावातील महिलांसाठी केटरिंग व्यवसाय उभारण्याचा मानस सरपंच सोनाली आतिष पवार यांनी व्यक्त केला आहे.
सध्या महिला भांडी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. भविष्यात याच अनुभवाचा आधार घेत स्वयंपाक, खाद्यपदार्थ आणि कार्यक्रमांसाठी संपूर्ण केटरिंग सेवा देणारा महिला गट उभारण्याची दिशा आखली जात आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनातून सुरू झालेला हा उपक्रम महिलांच्या कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन बनण्याची शक्यता आहे.
‘चांपा पॅटर्न’ची खरी ताकद
चांप्याची गोष्ट केवळ प्लास्टिकमुक्तीची नाही. एका समस्येवर उपाय शोधताना ग्रामपंचायतीने पर्यावरण, महिला रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्था या तीनही बाबी एकत्र आणल्या आहेत.
प्लास्टिकच्या एका प्लेटचा वापर काही मिनिटांचा; मात्र त्यातून निर्माण होणारा कचरा दीर्घकाळ पर्यावरणात राहतो. चांप्याने त्याऐवजी पुन्हा-पुन्हा वापरता येणाऱ्या स्टीलच्या भांड्यांचा मार्ग स्वीकारला. भांडी बँकेची जबाबदारी महिलांकडे दिली आणि त्यातून रोजगाराची संधी निर्माण केली.
सात महिन्यांत ९० टक्के डिस्पोजलमुक्तीचा टप्पा गाठल्याचा ग्रामपंचायतीचा दावा आणि त्याची मुख्यमंत्री कार्यालयाने घेतलेली दखल यामुळे चांप्याचा प्रयोग इतर गावांसाठीही अनुकरणीय ठरू शकतो. कचरा कमी करण्यासाठी पर्याय दिला, पर्यायाची जबाबदारी महिलांना दिली आणि त्या जबाबदारीतून रोजगार निर्माण केला—चांप्याच्या ‘स्टील भांडी बँके’ची खरी ताकद याच त्रिसूत्रीत आहे.
सोनाली आतिष पवार, सरपंच, गट ग्रामपंचायत चांपा