मुंबई
drishyam 3 काही चित्रपट केवळ कथा सांगत नाहीत, तर प्रेक्षकांना त्या कथेचा प्रत्यक्ष भाग बनवतात. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतरही त्यातील प्रसंग आणि अनुभव मनात रेंगाळत राहतो. ‘दृश्यम ३ : द कन्क्लूजन’ हा त्याच प्रकारचा उत्कंठावर्धक आणि थरारक अनुभव देणारा चित्रपट ठरतो. पहिल्या दोन भागांनी निर्माण केलेली उत्सुकता, विजय साळगावकरचे बुद्धीचे खेळ आणि त्याच्याभोवती निर्माण झालेले प्रश्न या तिसऱ्या भागात पुढे नेण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा गुंतागुंतीच्या रहस्यविश्वात प्रवेश करतो.
मल्याळम आवृत्तीशी असलेले नाते कायम ठेवत हा चित्रपट काही बाबतींत स्वतंत्र अनुभव देतो. कथानकातील प्रत्येक टप्प्यावर तणाव आणि उत्कंठा निर्माण करण्याचा प्रयत्न जाणवतो. पुढच्या क्षणी काय घडणार, कोणता धागा कोणत्या रहस्याशी जोडला जाणार आणि विजय साळगावकर या नव्या संकटातून कसा मार्ग काढणार, हा प्रश्न चित्रपटाच्या अखेरपर्यंत कायम राहतो. पहिल्या दोन भागांतील घटनांचे पडसाद अजूनही कथेत जाणवतात. विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाभोवती घडलेल्या घटनांमुळे निर्माण झालेले प्रश्न भूतकाळातून पुन्हा वर्तमानात येतात. जुन्या घटनांशी संबंधित धागे नव्या परिस्थितीत समोर येत असल्याने विजयसमोरील आव्हान यावेळी अधिक गुंतागुंतीचे बनते. तपासाची बदलणारी दिशा, नव्याने उपलब्ध होणारे पुरावे आणि अनपेक्षित वळणे यामुळे त्याच्या बुद्धिमत्ता, संयम आणि प्रसंगावधानाची पुन्हा कसोटी लागते.
‘दृश्यम’च्या या विश्वाची खरी ताकद त्यातील रहस्य उलगडण्यात जितकी आहे, तितकीच ते प्रेक्षकांसमोर कोणत्या पद्धतीने मांडले जाते यात आहे. त्यामुळे चित्रपटातील महत्त्वाचे ट्विस्ट किंवा रहस्य आधीच सांगणे योग्य ठरणार नाही. संवाद, प्रसंग आणि पडद्यावर दिसणारी एखादी छोटीशी गोष्टही पुढे जाऊन कथानकातील महत्त्वाचा दुवा ठरू शकते. सुरुवातीला सामान्य वाटणाऱ्या घटनांचे महत्त्व नंतर उलगडत जाते आणि त्यामुळे प्रेक्षकाचे लक्ष सतत कथेकडे खिळून राहते.
विजय साळगावकरच्या भूमिकेत drishyam 3 अजय देवगणने पुन्हा एकदा संयत आणि प्रभावी अभिनय केला आहे. परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करणे, शांत राहणे आणि योग्य वेळी अचूक निर्णय घेणे ही विजयची वैशिष्ट्ये अजयने केवळ संवादांच्या माध्यमातून नव्हे, तर चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव, डोळ्यांतील हालचाली आणि देहबोलीतून प्रभावीपणे व्यक्त केली आहेत. अनेक प्रसंगांत त्याचे मौनच संवादापेक्षा अधिक काही सांगून जाते.जयदीप अहलावत यांच्या अभिनयाचा विशेष उल्लेख करावा लागतो. व्यक्तिरेखेच्या भावविश्वातील बदल त्यांनी चेहऱ्यावरील भाव आणि प्रसंगानुरूप एक्स्प्रेशन्समधून ताकदीने मांडले आहेत. व्यक्तिरेखेतील बारकावे त्यांनी अचूक पकडले असून अनेक दृश्यांमध्ये संवादांइतकेच त्यांचे हावभाव प्रभावी ठरतात. पडद्यावरील त्यांची उपस्थिती कथेला वेगळी धार देते. तब्बू यांनी व्यक्तिरेखेतील भावनिक गुंतागुंत, ताण आणि अस्वस्थता संयतपणे साकारली आहे. प्रकाश राज यांच्या संवादफेकीत आणि देहबोलीत त्यांच्या अनुभवाची छाप जाणवते. कमलेश सावंत, श्रेया सरन यांच्यासह अन्य कलाकारांनीही आपापल्या भूमिका प्रभावीपणे साकारत कथेला आवश्यक भावनिक आधार दिला आहे.चित्रपटाचे संवाद हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे बलस्थान आहे. आमिल कियान खान यांनी लिहिलेले संवाद वरवर साधे वाटत असले तरी त्यामध्ये कथानकाशी संबंधित अनेक संदर्भ दडलेले आहेत. काही संवादांचा खरा अर्थ कथा पुढे सरकल्यानंतर अधिक स्पष्ट होतो. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवण्यात संवाद महत्त्वाची भूमिका बजावतात.
तांत्रिक अंगानेही चित्रपटाची मांडणी भक्कम आहे. सुधीर कुमार चौधरी यांच्या सिनेमॅटोग्राफीमधून गोव्याचे निसर्गसौंदर्य आणि कथेला आवश्यक असलेले रहस्यमय वातावरण यांचा सुरेख मेळ साधण्यात आला आहे. प्रकाश-छायांचा वापर, कॅमेरा अँगल्स आणि दृश्यरचना यामुळे अनेक प्रसंगांतील तणाव अधिक गडद होतो. रवि बसरूर, रोचक कोहली आणि कर्मा यांच्या संगीतासोबत अमर मोहिले यांच्या पार्श्वसंगीताने थराराची परिणामकारकता वाढवली आहे. प्रसंगाच्या गरजेनुसार योग्य वेळी तीव्र होणारा बॅकग्राउंड स्कोअर अनेक दृश्यांना अधिक प्रभावी बनवतो.संदीप फ्रान्सिस यांच्या एडिटिंगमुळे चित्रपटाची गतीही संतुलित राहते. सस्पेन्सपटातील एखादा प्रसंग किती वेळ टिकवायचा आणि कुठे कथेला वेग द्यायचा, याचा योग्य मेळ साधण्यात आला आहे. बायलॉन फोन्सेका यांचे साउंड डिझाइनही वातावरणनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते. विशेष म्हणजे या चित्रपटात केवळ आवाजाचाच नव्हे, तर शांततेचाही परिणामकारक वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक प्रसंगांतील ताण अधिक ठळकपणे जाणवतो.
दिग्दर्शक म्हणून अभिषेक पाठक यांनी कथा, पटकथा, संवाद, अभिनय, संगीत, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग या विविध घटकांना एकसंधपणे बांधत चित्रपटातील थरार अखेरपर्यंत टिकवून ठेवला आहे. मूळ कथा जीतू जोसेफ यांची असल्याने ‘दृश्यम’च्या मूळ विश्वाशी असलेले नातेही कायम राहते.
एकूणच, ‘दृश्यम ३ : द कन्क्लूजन’ हा केवळ सस्पेन्स-थ्रिलर न राहता प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवणारा सिनेमॅटिक अनुभव ठरतो. अजय देवगणचा संयत अभिनय, जयदीप अहलावत यांचा दमदार परफॉर्मन्स, तब्बू आणि प्रकाश राज यांची प्रभावी साथ, अर्थपूर्ण संवाद, आकर्षक सिनेमॅटोग्राफी, थरार वाढवणारे संगीत व पार्श्वसंगीत, चपखल एडिटिंग आणि प्रभावी साउंड डिझाइन या सर्वांचा एकत्रित परिणाम चित्रपटाला वेगळी उंची देतो. रहस्याच्या गुंत्यात प्रवेश करून प्रत्येक दृश्यामागील अर्थ शोधत विजय साळगावकरच्या बुद्धीच्या खेळाचा शेवटपर्यंत भागीदार होणे, हीच या चित्रपटाची खरी गंमत आहे. प्रत्येक क्षणी पुढे काय घडेल, याची उत्सुकता वाढवत जाणारा आणि पडदा पडल्यानंतरही मनात ठसा उमटवणारा हा थरारक अनुभव पाहण्यासारखा आहे.