नवरात्रोत्सवाची भक्तांमध्ये उत्सुकता; आगमनाची जय्यत तयारी

मूर्तिकारांची लगबग वाढली

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
वाशीम,
navratri-festival सध्या सण-उत्सवांची जोरदार धामधूम सुरू असून, या काळात विविध घटकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. यामध्ये मूर्तिकारांचाही समावेश असून, जन्माष्टमीपासून सुरू होणारा त्यांचा रोजगार गणेशोत्सव, गौरी उत्सव, शारदा देवी आणि आता नवदुर्गा उत्सवापर्यंत कायम राहतो. त्यामुळे सध्या मूर्तिकार नवदुर्गेच्या मूर्ती साकारण्यात व्यस्त असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
 
 
navratri-festival
 
गणेशोत्सवाचा समारोप होताच श्राद्धपक्षाला सुरुवात झाली असून, सर्वपित्री अमावस्येनंतर आश्विन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात नवरात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच नवदुर्गा उत्सवही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. घटस्थापनेसह दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना करून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतशी सार्वजनिक मंडळांच्या कामांना वेग आला आहे. विविध मंडळांचे पदाधिकारी व सदस्य बैठका घेऊन मंदिर परिसराची सजावट, विद्युत रोषणाई, मंडप व्यवस्था तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करीत आहेत. काही सार्वजनिक मंडळांकडून नवरात्रोत्सवात रास-गरब्याचे आयोजन करण्याची तयारीही सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागातील देवीभक्त नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गावातील विविध भागांत नवदुर्गेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून नऊ दिवस भक्तिभावाने पूजा-अर्चना केली जाते. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत भागवत, कीर्तन, भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
 
 
दरवर्षी मूर्ती तयार करण्यासाठी लागणार्‍या साहित्याच्या किमती वाढत असल्याने मूर्तींच्या किमतीतही वाढ होत आहे. रंग, माती, सजावटीचे साहित्य तसेच अन्य आवश्यक वस्तू महागल्याने मूर्तिकारांवरील खर्चाचा भार वाढला आहे. मात्र, श्रद्धेपुढे महागाईही दुय्यम ठरते, अशी भावना देवीभक्त व्यक्त करीत असून, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी भाविकांची तयारी सुरू आहे.