नागपूर,
Football stars in Nagpurनागपूर शहर फुटबॉलसाठी पोषक असून येथे प्रतिभावान खेळाडूंची मोठी संख्या आहे. या खेळाडूंची गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून दिल्यास नागपुरातून राष्ट्रीय व स्तरावरील खेळाडू घडू शकतात, असा विश्वास मिनर्व्हा अकादमीचे संस्थापक व प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक रणजित बजाज यांनी व्यक्त केला.
रेशीमबाग मैदानावर नागपूर महानगर पालिका आणि आई कुसुमताई सहारे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापौर चषक २०२६ सेलिब्रिटी ओपन फुटबॉल स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी रणजित बजाज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रामदासपेठ येथील सेंटर पॉईंट येथे आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते.
बजाज म्हणाले, नागपुरातील फुटबॉल खेळाडूंमध्ये प्रतिभा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र ही प्रतिभा योग्य वेळी ओळखणे आणि तिला योग्य दिशा देणे आवश्यक आहे. खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणासोबतच स्पर्धात्मक व्यासपीठ मिळाले, तर ते निश्चितच मोठी मजल मारू शकतात.
शहरातील स्पर्धा आणि फुटबॉलच्या वाढत्या वातावरणामुळे नवोदित खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळत आहे. अशा स्पर्धांमधून गुणवंत खेळाडू शोधून त्यांना पुढील स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही बजाज यांनी सांगितले.
लक्ष २०३६ च्या विश्वचषकाकडे
भारतीय फुटबॉलच्या भविष्यासंदर्भात बोलताना रणजित बजाज यांनी २०३६ च्या फुटबॉल विश्वचषकासाठी आतापासूनच तयारी करण्याची गरज व्यक्त केली. युवा खेळाडूंमध्ये शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण स्पर्धांचा अनुभव यावर भर दिल्यास भारतीय फुटबॉलला नवी दिशा मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. आम्ही २०३६ च्या विश्वचषकासाठी पूर्ण तयारीच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. भारताने मोठे यश मिळवावे, हा आमचा ठाम विश्वास आहे, असेही बजाज म्हणाले.
नागपुरात तीन टर्फ उभारण्याचा प्रयत्न : महापौर
महापौर नीता ठाकरे यांनी सांगितले की, शहराच्या विकासासोबतच खेळाडूंना आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यावरही महापालिकेचा भर आहे. फुटबॉलच्या विकासासाठी नागपुरात सध्या तीन टर्फ उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खेळाडूंना सरावासाठी चांगल्या सुविधा मिळाल्यास शहरातील फुटबॉलला आणखी चालना मिळेल.
रणजित बजाज यांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्या वरिष्ठ पातळीवर मांडण्यात येतील. शक्य त्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही महापौर ठाकरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी क्रीडा सभापती दर्शना धवड, क्रीडा अधिकारी पीयूष अंबुलकर, आई कुसुमताई सहारे फाऊंडेशनचे संस्थापक नागेश सहारे, अब्दुल रफिक, अतुल पंडित यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नागपूरमधील फुटबॉलला नवे व्यासपीठ, दर्जेदार सुविधा आणि गुणवंत खेळाडूंची प्रतिभा यामुळे शहराच्या फुटबॉल संस्कृतीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.