रशियाच्या हल्ल्यात भारतीय प्रकल्प उद्ध्वस्त

युक्रेनमध्ये एकाचा मृत्यू तर कित्येक जखमी

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
कीव्ह,
kusum-group-drone-attackरशियाने ड्रोन्सच्या माध्यमातून युक्रेनमधील भारतीय औषध कंपनी ‘कुसुम ग्रुप’च्या एका विशाल प्रकल्पावर हल्ला चढवला. यात एकाचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. युक्रेनच्या सुमी येथील औषध प्रकल्पाची बहुतांश मुख्य रचना नष्ट झाली. मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
 
drone
 
ड्रोनने मारा केलेल्या भागातून धुराचे मोठे लोट उठत असल्याचे दिसून आले. ‘कुसुम’ समूहाची सुरुवात १९९४ मध्ये युक्रेनला भारतीय औषधांची निर्यात करणाऱ्या वितरकाच्या रूपात झाली. सध्या याचे संचालन भारतीय नागरिक राजीव गुप्ता करतात. २००२ मध्ये कंपनीने इतर कंपन्यांच्या उत्पादनांचे वितरण थांबवले आणि स्वतःच्या ब्रँड्सचे विपणन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कंपनीने उत्पादन क्षेत्रात पाऊल टाकले. २००७ मध्ये भारतात आणि २००९ मध्ये युक्रेनमधील सुमी येथे कारखाने सुरू केले आणि त्यानंतर भारतात आणखी दोन उत्पादन केंद्रे उभारली.
 
हा समूह ५० पेक्षा जास्त उत्पादने (प्रामुख्याने ‘जेनेरिक’ प्रकारातील) तयार करतो आणि नऊहून अधिक देशांमध्ये त्यांची विक्री करतो; यामध्ये प्रामुख्याने युक्रेन, उझबेकिस्तान, कझाकस्तान आणि फिलिपाईन्सचा समावेश आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये रशियन हल्ल्याचा निषेध केला आणि या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे कुटुंबीय व आप्तांप्रती शोकसंवेदना व्यक्त केली. आज सकाळी रशियन सैन्याने पुन्हा एकदा कीव्हमधील पिवनिचनी पुलावर ड्रोनद्वारे हल्ला केला. त्यांनी सुमीमधील औषधांच्या एका सामान्य गोदामावरही ड्रोनने हल्ला केला. दुर्दैवाने, यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या आणि आप्तांच्या दुःखात सहभागी आहे. निप्रोमध्ये त्यांनी एका दळणवळण केंद्रावर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये सहा जण जखमी झाले, असे झेलेन्स्की म्हणाले.
 
रशियाचे ‘शाहेद’ प्रभावशाली
उन्हाळ्यापासून रशियाने युक्रेनमध्ये दररोज जवळपास बारापेक्षा जास्त वेगवान आणि तुलनेने स्वस्त जेट-शक्तीवर चालणारे शाहेद ड्रोन प्रक्षेपित केले आहेत. त्यांना गाठण्यासाठी इंटरसेप्टर ड्रोन्सचा वेग खूपच कमी पडत असल्याने युक्रेनच्या हवाई संरक्षण पथकांना अडचणी येत आहेत.
 
युक्रेनकडून ‘एफपी-७’ चा वापर
युक्रेनने या आठवड्यात आपल्या देशांतर्गत निर्मित एफपी-७ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा (ज्याची पल्ला क्षमता सुमारे २५० किमी आहे) वापर पहिल्यांदाच युद्धात केल्याची घोषणा केली.